◾मुलीच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून न्यायालयाची केली दिशाभूल
◾ शिंदे गटाच्या प्रभाकर राऊळ च्या कारनामा मुळे पालघर मध्ये अब्रू चव्हाट्यावर
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: स्वतः च्या मुलीला व जावाईला गेल्या अनेक वर्षांपासून त्रास देवून मारहाण करणाऱ्या बोईसर मधील शिंदे गटाच्या एका नेत्यांवर पुन्हा एकदा बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महाशयांनी आपल्या जावाईला मारहाण आणि विनयभंग प्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयातून जामीन मिळावा म्हणून स्वत:च्याच विवाहीत मुलीच्या नावाने बनावट अर्ज पोलिस स्टेशनमध्ये सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात शिंदे गटाची अब्रू अक्षरक्ष चव्हाट्यावर आली आहे.
पालघर मधील बोईसर येथील शिंदे गटाचा पदाधिकारी प्रभाकर राऊळ याने स्वत:च्या मुलीने जातीबाहेर लग्न केल्याच्या रागातून जावयाला स्वतः व आपल्या गुंडाकडून बेदम मारहाण करून त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत केली होती. राऊळ हा मुलगी आणि जावयाला सतत त्रास देत होता. १४ सप्टेंबर २०२२ रोजी प्रभाकर राऊळ याने पुन्हा एकदा आपले गुंड मुन्ना उर्फ अब्दूल रशीद खान,विजय गर्जे आणि दिलीप धोडी यांच्या मार्फत जावई आणि मुलगी यांच्यावर हल्ला करीत त्यांना जबर मारहाण व मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणी बोईसर पोलिस स्टेशन येथे २३ मार्च २०२२ रोजी प्रभाकर राऊळ आणि त्याच्या तीन गुंडांवर भा.दं.वि.कलम ३५४,३२६,३२४,३२३१४७,१४८,१४९,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयात हल्ला करणारे तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र प्रभाकर राऊळ हा अटकेच्या भीतीने व पोलिसांच्या मदतीने ३ महीने फरार झाला होता. स्वत: ची अटक टाळण्यासाठी राऊळ याने विवाहीत मुलीच्या नावाने पतीविरोधात बनावट तक्रार अर्ज व सही करून बोईसर पोलिस स्टेशन येथे सादर केला होता. या अर्जाच्या आधारे अहवाल तयार करून तो पालघर सत्र न्यायालयात सादर केल्यावर प्रभाकर राऊळ याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता.
प्रभाकर राऊळ यांनी जामीन कोणत्या आधारे मिळाले याची माहिती घेण्यासाठी प्रभाकर राऊळ याच्या मुलीने माहिती अधिकार करून माहिती मागितली त्या माहितीत तिच्याच नावे पतीच्या विरुद्ध तक्रारीचे पत्र मिळाले. तिने ते त्याची सत्यता पडताळणी केल्यावर त्या तक्रारीत सही खोटी असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी बनावट सही व तक्रार अर्ज करून न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी प्रभाकर राऊळ याच्या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर बोईसर पोलिस स्टेशन येथे प्रभाकर राऊळ याच्या विरोधात भा.दं.सं.कलम ४६८,४६५,१९१,१९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.