◾पदाचा गैरवापर करत तपासाच्या नावाखाली पत्रकारांची केली गेली रेकी; पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला होता खोटा गुन्हा दाखल
◾ खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांना त्रास देण्याचा प्रयत्न उघड; कर्तव्यदक्ष समजल्या जाणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक आशिष पाटीलांनी कोणाच्या दाबामुळे कर्तव्यात केली कसुर
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: शहरात प्रभारी अधिकारी बदलल्या पासून गुन्हेगारी करण वाढले असतानाच खोटे गुन्हे दाखल करून घेण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यातच एका दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यात तपास देखील खोट्या पद्धतीने केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे तपास अधिकारी व पोलिस निरीक्षक यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पालघर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे.
बोईसर शहरातील मधूर हॉटेल येथे ६ जानेवारी २०२३ रोजी पत्रकार दिनाच्या दिवशी पत्रकार उमाकांत भारती यांना जातीवाचक शिवीगाळ व सोशल मीडिया बदनामी केल्याबाबत बोईसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. याबाबत काशिफ अंसारी व इतर दोघांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत बोईसर पोलिस ठाण्यात १० जानेवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याअगोदर तक्रार देवुन देखील पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी तक्रार दाखल करून घेण्यासाठी वारंवार टाळाटाळ केली होती. याबाबत पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना तक्रार केल्यानंतर ९ जानेवारी २०२३ रोजी रात्री उशिरा फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली व १० जानेवारी रोजी याबाबत पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर काशिफ अंसारी यांनी आपल्याला मारहाण ६ जानेवारी २०२३ रोजी झाल्याचे सांगुन एनसीआर उमाकांत भारती यांच्या सह इतरांवर दाखल केला असल्याची माहिती समोर आली होती. मात्र १० जानेवारी रोजी रात्री वेळी राजकीय हस्तक्षेप व पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांचा पत्रकारांवर असलेला राग यामुळे त्यांनी पत्रकार उमाकांत भारती, सुशांत संखे, ज्ञानेश्वर रामोशी या पत्रकारांवर ६ जानेवारी रोजीचा खोटा घटनाक्रम रचून काशिफ अंसारी यांची फिर्याद नोंदवून घेतली. काशिफ अंसारी याला मारहाण करण्यात आली त्यांचे अंगावरचे सोन्याची चैन अंगठी व पैसे चोरी केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे हे नेहमीच गुन्ह्यात संधी शोधण्याचा प्रयत्न करतात यावेळी कोणतेही पुरावे पत्रकारांन विरोधात नसताना देखील त्यांनी खोटा तपास सुरू करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक आशिष पाटीलांना तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली. इतर वेळी ज्या बिट मध्ये घटना घडली त्या बिटचा अधिकारी किंवा एखाद्या हवालदार कडे तपास दिला जातो. मात्र बनावट दाखल केलेल्या गुन्ह्यात कसबे यांनी पत्रकारांना दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पत्रकारांवर दाखल करण्यात आलेला खोट्या गुन्ह्यात ६ तारखेचा घटनाक्रम दाखवला असताना पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे व आशिष पाटीलांनी पत्रकारांचे एसडीआर, सिडीआर, टॉवर लोकेशन खोटा गुन्हा दाखल होण्याच्या अगोदर ३१ डिसेंबर २०२२ पासून काढण्यात आले होते. गोपनीय माहिती काढून पोलिसांनी पत्रकारांची रेकी केली असल्याचा पत्रकारांचा पोलिसांवर आरोप आहे. तपास अधिकारी आशिष पाटीलांनी प्रदिप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा बनावट तपास केला असुन यातील दाखवलेले साक्षीदारांनी प्रत्येक्षात चोरी पाहिली नसल्याचे म्हटलं आहे. विशेष म्हणजे उपविभागीय पोलिस अधिकारी नित्यानंद झा यांनी ॲट्रॉसिटी तपासात मधूर हॉटेल येथील प्रत्यक्षदर्शी हॉटेलच्या एकाचा घेतलेला जबाब यामध्ये वेगळाच खुलासा समोर आला आहे. यामध्ये अंसारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उमाकांत भारती सोबत वाद घातल्याचा उल्लेख आहे.
पत्रकार उमाकांत भारती यांना जातीवाचक शिवीगाळ झाल्यानंतर पत्रकार भारती यांनी अंसारी यांना पकडून ठेवले व बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांना फोन केला तसेच पोलिस कंट्रोल ११२ नंबर वरती फोन केला. घटना स्थळी पोलिस उपनिरीक्षक शरद सुळरकर व मनिकरी हे अधिकारी याठिकाणी उपस्थित होते. यानंतर पोलिसांनी अंसारी यांना पोलीस ठाण्यात आणले होते. हा सर्व प्रकार पोलिस अधिकारी यांच्या समक्ष घडला असताना या प्रकरणात पोलिसांचा कोणताही जबाब नोंदवला नाही. बोईसर पोलिसांनी पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा तपास अधिकारी म्हणून विजय डावखरे असा उल्लेख होता मात्र त्यावर काट मारून आशिष पाटील यांचे नाव लिहिण्यात आले. बनावट दाखल गुन्ह्यात गुन्हा उशिरा दाखल होण्याचे कारण देखील मजेशीर असून यामध्ये फिर्यादी व आरोपी हे पत्रकार असल्याने त्यांनी एकमेकांशी चर्चा केली. परंतु त्यांचेतील वाद न मिटल्या मुळे तक्रार देण्यास उशिराने गुन्हा दाखल आहे असा उल्लेख आहे. जर या उल्लेखानुसार फक्त वाद न मिटल्या चे कारण होते तर मग चोरीचा बनावट प्रकार कसा घडला हा मजेशीर विषय आहे.
◾बोईसर पोलिसांनी पुन्हा २१ मार्च २०२३ रोजी ६ जानेवारी २०२३ रोजीचे पत्रकारांचे मोबाईल लोकेशन पोलिस अधीक्षक यांच्या कडून मागविण्यात आले असल्याचा उल्लेख दोषारोपपत्रात आहे. यामुळे पोलिस नेमके कोणती संधी शोधण्याचा प्रयत्न करतात हा मोठा विषय आहे. महत्वाचे म्हणजे खोटा गुन्हा खरा दाखविण्यासाठी फिर्यादीने बोईसर येथील गुरूकृपा ज्वेलर्स चे खोटे बिल बोईसर पोलिसांना सादर केले. त्या बिलाची सत्यता पालघर दर्पण ने तपासणी केली असता बिल हे खोटे असून बिलावर इस्टिमेंट बिल असा उल्लेख आहे. तसेच बिलावर २१ जानेवारी २०२२ चा उल्लेख असून सोन्याचा दर देखील खोटा लिहला आहे.
◾पोलिस तपासाचे टिपण मध्ये फिर्यादी सोबत असलेल्या साक्षीदारांनी कोणीही ६ जानेवारी रोजी घटनास्थळी मधुर हॉटेल जवळ पत्रकार हेमेंद्र पाटील उपस्थित असल्याचा उल्लेख नाही. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी ॲट्रॉसिटी गुन्ह्यात तपास करण्यासाठी उमाकांत भारती यांचा एसडीआर, सिडीआर, टॉवर लोकेशन काढले त्यामध्ये घटना घडली त्यानंतर उमाकांत भारती पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे व पत्रकार हेमेंद्र पाटील यांना वारंवार फोन करत असल्याचे समोर आले आहे. जर घटनास्थळी पत्रकार पाटील उपस्थित नाही हे उघड असताना कसबे व तपास अधिकारी आशिष पाटीलांनी बनावट दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून जाणीवपूर्वक नाव गोवण्याचा पराक्रम केल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई झाल्याने बदली होऊन पुन्हा बोईसर मध्ये आलेल्या हायप्रोफाइल नेत्यांच्या संपर्कात असलेल्या पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.