◾ आदिवासी सामाजिक कार्यकर्ते यांचे बोईसर ग्रामपंचायत विरोध उपोषण
◾ साधारण एक करोडची वसुली होणाऱ्या बाजारात फक्त ग्रामपंचायतीला २४ लाखांचा चुना
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: राजकीय मंडळींनी आपली उपजीविका करण्यासाठी बोईसरचा बाजार कर ठेका आपल्याच फंटरला मिळावा यासाठी सर्वांचा रोष ग्रामपंचायतीने ओढवून घेतला आहे. विशेष म्हणजे गुपचूप बोईसर मधील आपल्या सोबत असलेल्या कधीही ग्रामपंचायत विरोध न जाणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधीला तातडीने नोटीस छापण्यासाठी लावून बेकायदेशीर पणे ही प्रक्रिया पार पाडली. ग्रामपंचायत डबक्यात गेली तरी चालेल पण बाजार कर ठेका आपल्याच कडे असावा यासाठी घाईघाईने पार पाडलेल्या बोली ठेका आता अडचणीत आला आहे.
बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील मोठ्या प्रमाणात उलाढाल होणाऱ्या बोईसर बाजार कर ठेक्यावर येथील राजकीय नेत्यांची उपजिविका सुरू असते. यामुळे हा ठेका आपल्याच फंटरला मिळावा साठी मोठ्या प्रमाणात चढाओढ सुरू होते. ३१ मार्च २०२३ पासून बाजार कर फेकल्याची मुदत संपत असल्याने १६ मार्च रोजी ग्रामपंचायत मासिक सभेत बाजार कर ठेका बाबत निर्णय घेवून २० तारखेला बोली पध्दतीने ठेका देण्यासाठी एक नोटीस देण्याचे ठरविण्यात आले. पेपर नोटीस आठ दिवस अगोदर देणे बंधनकारक असताना देखील आपल्या सोईसाठी जवळच्या वृत्तपत्र प्रतिनिधीला जे नेहमीच ग्रामपंचायत ची साथ देतात अशा एकाला दोन वृत्तपत्रात नोटीस छापून आणण्याची जबाबदारी दिली. या महाशयांनी देखील ग्रामपंचायत च्या नियमबाह्य कामांना गती देण्यासाठी लागलीच नोटीस छापून आणली. मात्र लाखोंची लोकसंख्या असलेल्या बोईसर मध्ये थोडेफार वृत्तपत्र येत असल्याने अशा नोटीसी कडे कोणाचेही लक्ष गेले नाही. यामुळे ग्रामपंचायतीला संधी साधण्यासाठी मैदान खुले झाले.
ग्रामपंचायत मध्ये २० मार्च २०२३ रोजी ११ वाजता बोली पध्दतीने ठेका दिला जाणार असल्याची माहिती काही लोकांना मिळताच त्यांनी तातडीने ग्रामपंचायत गाठलं होतं. आम्हाला देखील ठेका घेण्यासाठी बोली पध्दतीने मध्ये सहभाग घेण्यासाठी नियमानुसार पैसे डिपॉजीट करायचे आहेत असे सांगितले असताना देखील इतर कोणाचेही डिपॉजीट भरणा करून घेतले नसल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी महेश धोंडी यांनी करून याबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक कार्यकर्ते महेश धोंडी यांनी ग्रामपंचायत विरोधात पंचायत समिती येथे उपोषणाला ३ एप्रिल पासून बसण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बोईसर ग्रामपंचायत बाजार कर ठेका वादात अडकला आहे. सत्ताधारी पक्षांच्या एकाला ठेका मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने सर्व नियम धाब्यावर बसवून कामकाज केल्याचा आरोप होत असल्याने कोट्यवधी रुपये वसुली होणाऱ्या बाजार करात कोणा कोणाला किती कर मिळणार हा चौकशीचा भाग आहे. यामुळे या प्रकरणात आता नेमकी काय कारवाई प्रशासन करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◾टाळेबंदीत बोईसर ग्रामपंचायत बाजार कर वसुली ही साधारण एक वर्ष ग्रामपंचायतीने केली होती. यावेळी फक्त मुख्य रस्ता व बोईसरचा मुख्य बाजार येथून महिन्याला सरासरी ३ लाख ५० हजार वसुली सुट्टीचे दिवस सोडून केली जात होती. वर्षभरात अंदाजे ४० लाख पेक्षा जास्त कर वसुल करण्यात आला होता. ग्रामपंचायतीला लाखो रूपयांचा नफा झाला असताना देखील फक्त राजकीय मंडळींना अर्थलाभ होण्यासाठी हा बाजार कर ठेका काढण्यात आला आहे.
◾ मागच्या काही महिन्यांत आता इतर नावाने ठेका मिळालेला “बाजार कर आशिक” यांने दिवसाला बाजार कराची वसुली २१ हजार साधारण व सणासुदीला ३५ हजार पर्यंत केली होती. गल्ली बोळात जावुन पहाटे चार वाजता वसुली सुरू होते. टेबल घेवून रस्ता लगत बसतात त्यांच्या कडून महिन्याला ५ ते ८ हजार पर्यंत भाडे वसुल केले जाते. अशा प्रकारे साधारण वर्षाला एक करोड रुपये वसुली केली जाते.
◾ बाजार कर ठेका बोली पध्दतीने निविदा प्रक्रिया मध्ये एकूण तीन लोकांचा सहभाग दाखविण्यात आला होता. यामध्ये दोन ठेकेदार यांना दबाव टाकून ठेका ग्रामपंचायतीने आपल्या सोयीच्या माणसाला देण्याचे ठरविले आणि बेकायदेशीर पणे कागदोपत्री बोली झाल्याचे दाखवलं. विशेष म्हणजे या बोली पध्दतीने ठेका बाबत कुठल्याही प्रकारचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले नाही.
◾ बोईसर ग्रामपंचायत मध्ये ठेकेदार बदलत असला तरी नेत्यांचा फंटर (बाजार कर आशिक) हा मात्र एकच आहे. तो वेगवेगळ्या ठेकेदारांच्या नावाने ठेका आपल्याच पदरात पाडून घेतो. महिन्या काठी लाखो रुपये वसुली केली जात असून यामध्ये बोईसर ग्रामपंचायतीला योग्य कर मिळत नसल्याने ग्रामपंचायत च्या तिजोरीवर त्याचा परिणाम होतो. ग्रामपंचायतीने आता दिलेला बाजार ठेका यामध्ये ग्रामपंचायतीचे साधारण ३० लाखांचे नुकसान केले असुन हा ठेका रद्द करण्याची मागणी केली जात आहे.