◾ राजकीय दबावामुळे बोईसर पोलिसांनी दाखल केला पत्रकारांवरच खोटा गुन्हा?
◾ उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातुन पत्रकारांना अटक करण्यासाठी डावपेच?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरात गुंडगिरी वाढली असून आता काही समाजकंटकांन कडून पत्रकारांना टार्गेट केल्याचे दिसून आले आहे. असाच प्रकार पुन्हा घडला असून येथील एका पत्रकारांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पत्रकारांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करायची सोडून पत्रकारांनावरच खोटा गुन्हा दाखल करण्याचा धक्कादायक प्रकार बोईसर पोलिसांनी केला आहे. याबाबत पोलिस अधीक्षक यांच्या कडे देखील तक्रारी दाखल करण्यात आली आहे.
बोईसर शहरात ५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पत्रकार उमाकांत भारती यांच्या वर औद्योगिक क्षेत्रातील रोशन ढाबा च्या समोर आपल्या पत्रकार मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना प्राणघातक हल्ला करण्यात आला. उमाकांत भारती यांचा पाठलाग करून येणाऱ्या सराईत गुन्हेगारांनी भारती यांच्या समोर दुचाकी आडवी लावली. यानंतर भारती यांचा दुरध्वनी घेचून घेत लाकडी दांडक्याने मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी दुचाकी चालवत असलेल्या पत्रकार राजेश कुशवाह यांने लागलीच दुचाकी तिथून काढून काही अंतरावर असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात गेले. यावेळी त्यांच्या मदतीला तिथे असलेले पोलिस कर्मचारी जयेश किणी व इतर कर्मचारी आले होते. यावेळी वेगवेगळ्या दुचाकी वरून आठ जणांची टोळी होती. या प्राणघातक हल्ल्यात उमाकांत भारती थोडक्यात वाचले असले तरी यांच्या हाताला झालेली दुखापत व हाताची दोन बोटं फॅक्चर झाली आहेत. हा गंभीर प्रकार घडला त्यानंतर भारती हे लागलीच बोईसर पोलिस ठाण्यात ७:३० वाजता दाखल झाले त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी टिमा रुग्णालयात पाठविण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असताना याठिकाणी भारती यांच्या वर हल्ला करणारे शाहीद शहा व विजय प्रसाद हे दिसून आले यावेळी शाहीद शहा या सराईत गुन्हेगारांच्या डोक्यावर जखम झाल्याने उपचारासाठी दाखल झाला होता. याबाबत याठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांना फोन करून ही माहिती दिली होती.
वैद्यकीय उपचार करून व हाताचा एक्सरे करून उमाकांत हे बोईसर पोलिस ठाण्यात आपली फिर्याद दाखल करण्यासाठी रात्री १० वाजताच्या सुमारास आले. यावेळी याठिकाणी उपस्थित असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांनी उमाकांत यांचे फिर्याद टाईप करून घेण्यासाठी ठाणे अंमलदारांना सांगितले. मात्र फिर्याद दाखल करून देखील गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ज्यावेळी पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे हे पोलिस ठाण्यात रात्री उशिरा दाखल झाले तिथपर्यंत अचानक परिस्थिती बदलली यावेळी उमाकांत यांना मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांची देखील उमाकांत व त्यांचे सहकार्य राजेश कुशवाह यांनी आम्हाला मारहाण केल्याचा बनाव रचून खोटी फिर्याद नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी सुरूवात केली. यानंतर पहाटे च्या वेळी काही समाजकंटक असलेल्या गुन्हेगारांनी बोईसर पोलिस ठाण्यात दाखल होऊन एका महिलेने पत्रकार उमाकांत व राजेश यांच्या विरोधात तक्रार आहे असे सांगत गुन्हा दाखल करण्याचे सांगितले. यानंतर बोईसर पोलिसांनी उमाकांत याला समज देत तु गंभीर गुन्हा दाखल केला तर तुझ्या विरोधात देखील मला महिलेची व एकाला डोक्यावर दुखापत झाल्याची देखील तक्रार दाखल करून घ्यावी लागेल असा एकप्रकारे दम दिला. मात्र आपल्यावर झालेला हल्ला, खेचून घेतलेला मोबाईल व त्यांच्या कव्हर मध्ये असलेले पाच हजार रुपये यावर गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी भारती हे आपल्या मतावर ठाम राहिले होते. याबाबत बोईसर पोलिसांन विरोधात पोलीस अधीक्षक यांच्या कडे पहाटेच्या वेळी लेखी तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. हा सर्व नाट्यमय प्रकार झाल्यावर भारती यांच्या फिर्यादीवरून गुन्हा पहाटे साधारण पाच वाजता दाखल झाला. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी कोणत्याही प्रकारची वस्तुस्थिती न पाहता पत्रकारांन वरील राग काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून पत्रकार उमाकांत भारती व राजेश कुशवाह यांच्या वर देखील दोन खोटे गुन्हे दाखल केले.
◾ नियोजन करुन भारती यांच्यावर हल्ला
उमाकांत भारती यांचा पाठलाग करून ते कुठे जातात याची माहिती घेत त्यांच्या वर पाळत ठेवण्यात आली होती. भारती हे त्यांच्या मित्रांनी सोबत जाणता राजा हॉटेल मध्ये बसले होते. त्या ठिकाणाहून ते निघाल्या नंतर त्याचा पाठलाग करून काही अंतरावर असलेल्या रोशन ढाबा येथे हा हल्ला करण्यात आला. हा हल्ल्याचे नियोजन हे विजय प्रसाद यांने केले असून हल्ला करण्यासाठी शाहिद शाह याला दोन दिवसांपूर्वी मुंबई येथून बोलाविण्यात आले होते. या प्रकरणात विजय प्रसाद, शाहीद शहा, रोशन या तिघांना बोईसर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले आहे. यातील फरार पाच आरोपी पैकी शाहीद शहा यांने धोडीपुजा येथील दोन मुलांना हल्ला करण्यासाठी बोलवले होते. तसेच संजित मिश्रा हा देखील या हल्ला प्रकरणात सहभाग असल्याची माहिती सूत्रांन कडून प्राप्त झाली आहे.
◾ उमाकांत भारती यांच्या वर हल्ला करण्याचा कट हा अवधनगर येथे एका भंगार वाल्यांच्या दुकानात बसुन रचला गेला होता. यातच यातील अटकेत असलेला आरोपी विजय प्रसाद यांने उमाकांत भारती याला हल्ला होण्याच्या पुर्वी साधारण चार दिवस अगोदर सोशल मीडियावर दम देत दोन दिवसांत दाखवतो असे सांगितले होते याबाबत बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
◾ बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा छडा लावत आरोपींची माहिती काढली होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक तपास हा इतर महिला अधिकारी यांच्या कडे दिला. महत्वाचे म्हणजे घटना औद्योगिक क्षेत्रात झाल्याने त्या बिट च्या अधिकाऱ्या कडे तपास देण्याचे टाळण्यात आले.
◾ उमाकांत भारती यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात घटना स्थळी पंचनामा करायचा आहे असे सांगत बोईसर पोलिसांनी भारती व राजेश कुशवाह यांना पोलीस ठाण्यात बोलवले घटनास्थळी फक्त फोटो काढून आल्यावर बोईसर पोलिस ठाण्यात आल्यावर भारती यांच्या वर दाखल असलेल्या खोट्या गुन्ह्यात पोलिस निरीक्षक यांनी सांगितल्यामुळे तुम्हाला अटक करतो असे तपास अधिकारी यांनी सांगितले. भारती यांच्या वर खोटा गुन्हा दाखल असताना पोलिसांनी पत्रकारांना त्रास व्हावा यासाठी जाणीवपूर्वक अटक केली.
◾भारती यांना अटक केल्यानंतर गुन्हा जामीन पात्र असल्याने सिआरपीसी ४३६ प्रमाणे पोलिस ठाण्यात जामिन मंजूर करावा यासाठी अर्ज करण्यात आला. मात्र यावेळी असलेल्या ठाणे अंमलदारांनी हा अर्ज स्विकारण्यासाठी नकार दिला. त्यानंतर याबाबत पोलिस अधीक्षक यांच्या कडे मेल करून माहिती देण्यात आली होती.
◾ उमाकांत भारती यांना अटक करावी यासाठी सतत पोलिसांना उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयातून दुरध्वनी येत होते. महत्वाचे म्हणजे उमाकांत यांना अटक करण्यापुर्वी वैद्यकीय तपासणी साठी घेवून जात असताना उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयातील खोंडे नावाचे अधिकारी पोलिसांना सतत फोन करत असल्याची माहिती उमाकांत भारती यांनी पालघर दर्पण सोबत बोलताना दिली.
◾ उमाकांत भारती यांनी यापूर्वी दाखल केलेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्यात तपास अधिकारी नित्यानंद झा यांच्या विरोधात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली होती. याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नाही. याचा राग मनात धरून पत्रकारांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप भारती यांनी केला आहे. यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातुन पत्रकारांना टार्गेट करण्यासाठी डावपेच रचले जात होते का याबाबत चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.