◾ बोईसरच्या दोन निष्ठावंतांना बॅनर वर जागा नाही; शहरात शिवसेनेत दोन गट
◾मातोश्रीचा प्रसाद देण्याची भाषा करणाऱ्या जगदीशयांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोईसर मध्ये उपस्थित राहणार
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरात मुख्यमंत्री येणार यासाठी जय्यत तयारी सुरू असली तरी येथील मुख्यमंत्र्यांचे निष्ठावंत शिलेदारांना कोणतेही स्थान दिले नसल्याने शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. बोईसर शहरात कार्यक्रम होत असताना तसेच शहरातील मुख्यमंत्र्यांचे निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारे फलकावर घेण्यात आले नाही. जिल्ह्यातील नेत्यांचे झाडून फोटो पाहावयास मिळत असले तरी शहरातील मुख्य नेत्यांना कोणतेही स्थान दिले नसल्याने येथील गटबाजी उफाळून आल्याचे दिसून येते.
राज्यातील सत्तासंघर्ष पेटवल्यानंतर ठाकरे गटात असलेल्या जगदीश धोंडी यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द काढत आमदारांना मातोश्री चा प्रसाद देवु अशी भाषा केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे समर्थक नरेश धोंडी यांनी जगदीश धोंडी यांचा पुतळा पेटविला होता. मात्र त्यानंतर महिनाभरातच जगदीश यांनी उद्धव ठाकरे यांची निष्ठा सोडून लागलीच एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले होते. आता याच जगदीश धोंडी यांनी आयोजित केलेल्या सामुदायिक लग्न सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित केले आहे. गेल्या आठवडाभरापासून याठिकाणी कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. आधार प्रतिष्ठान व शिवसेना आयोजित कार्यक्रम हा बोईसरच्या सर्कस मैदानात ठेवण्यात आला असून या सामाजिक कार्यक्रमाला पुर्णपणे राजकीय रंग देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत असलेले उपजिल्हा प्रमुख निलम संखे व बोईसर शहर प्रमुख मुकेश पाटील यांना पुर्ण पणे बाजूला करून जगदीश धोंडी यांनी केले असुन या दोघांना एकाही फलकावर घेण्यात आले नाही. यामुळे बोईसर शहरातील शिवसेनेतील गटबाजी उफाळून दिसू लागली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरत वारी पासून सर्व कामात सहभागी असलेले बोईसर शहरातील दोन शिलेदार निलम संखे व मुकेश पाटील हे शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. सत्तासंघर्ष वेळी नेमकी काय भूमिका घ्यावी यासाठी शांत बसणारे आज शिंदे यांच्या जवळ जाऊन जिल्ह्याची पदे आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी तत्पर असले तरी निष्ठावंत शिलेदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपले सर्वस्व पणाला लावून शिंदे यांचे इमान राखले होते. आता हेच दोन शिलेदारांना एकप्रकारे धुडकावून बोईसर मध्ये नवीन नेत्यांचा गट सक्रिय झाला असून गटबाजी उफाळून आल्याने यांचा मोठा फटका बोईसर शहरात पक्षाला होण्याची शक्यता आहे. जगदीश धोंडी यांनी पक्षाच्या बॅनर खाली कार्यक्रम आयोजित करून राजकीय रंग दिल्याने यावेळी कार्यक्रमाला वेगळाच राजकीय रंग चढला आहे. यातच निलम संखे व मुकेश पाटील यांनी देखील अनेकदा जगदीश धोंडी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असल्याने आता जगदीश धोंडी यांनी योग्य संधी शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
◾ बोईसर शहरात २० मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार अशी चर्चा असून प्रशासन देखील कामाला लागले आहे. विराज प्रोफाइल येथील हॅलिपॅड ची पाहणी देखील शुक्रवारी दुपारी करण्यात आली. मुख्यमंत्री यांचा बोईसर दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून बोईसर येथील सामुदायिक विवाह सोहळा व तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या संघटने सोबत बैठक घेणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथील गटबाजी कशी दुर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◾ आधार प्रतिष्ठान कडून गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी वर वधूचे विवाह सोहळा आयोजित केला जातो. जिल्ह्यातील अनेक गरिबांना त्यांचा उपयोग होतो. मोठ्या संख्येने याठिकाणी गरिब आदिवासी लोक उपस्थित राहत असतात. मात्र यावर्षी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात राजकीय रंग आल्याचे दिसून आले आहे.