◾ जगदीश धोंडी यांच्या बोईसर येथील लग्न सोहळ्यासाठी मैदान साफसफाई करण्यासाठी सरावली ग्रामपंचायत कर्मचारी
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरात असलेल्या एका खाजगी सामुदायिक लग्न सोहळ्यासाठी ग्रामपंचायतीवर बोजा टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एक मैदान साफसफाई करण्यासाठी चक्क चार दिवस झाले ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामपंचायतीचे वाहन वापरले जात आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची चर्चा असल्याने आता साफसफाई खर्चाचा बोजा ग्रामपंचायतीला उचलावा लागतो आहे.
बोईसर येथील सर्कस मैदानात २० मे रोजी जगदीश धोंडी यांच्या आधार प्रतिष्ठान मार्फत सामुदायिक लग्न सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची चर्चा असल्याने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र खाजगी कार्यक्रम तो देखील बोईसर ग्रामपंचायत हद्दीत असताना येथील मैदान साफसफाई करण्यासाठी सरावली ग्रामपंचायतीचे कर्मचारी कामाला लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून याठिकाणी साधारण ८ ते १० सरावली ग्रामपंचायत कर्मचारी काम करत असल्याने या खर्चाचा बोजा ग्रामपंचायत उचलत आहे. यातच स्वच्छता कर्मचारी जगदीश धोंडी यांच्या कार्यक्रम ठिकाणी काम करत असल्याने सरावली हद्दीत मोठ्या प्रमाणात कचऱ्यांचे ढिग पाहावयास मिळत आहेत.
आधार प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी कसे याबाबत सरावली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष किणी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री येणार म्हणून कर्मचारी गेले असतील. तसेच कोणी कर्मचारी पाठवले बाबत पाहतो असे सांगुन अधिक बोलण्यास नकार दिला. महत्वाचे म्हणजे सरावली ग्रामपंचायतीवर जगदीश धोंडी यांचे वर्चस्व असल्यामुळे आपल्या राजकीय कामासाठी ग्रामपंचायत कर्मचारी नेहमीच वापरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खाजगी कार्यक्रमासाठी येत असले तरी त्यांचे कोणत्याही प्रकारची निष्ठा नसलेले नेते अशा प्रकारे आपल्या कार्यक्रमाचा भार सरकारी तिजोरीवर टाकत असल्याने या प्रकारावर सवाल उपस्थित केला जात आहे.