कोलंबी प्रकल्पाच्या जागेवर भाजप नेत्यांचे बस्तान!
◾ भाजपच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांने कोलंबी प्रकल्पाच्या जागेवर उभारला बेकायदेशीर पार्टी अड्डा
◾घोडाच्या कोलंबी प्रकल्पाचा नजराणा भरतच्या हस्ते
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: शासनाने कोलंबी संवर्धनासाठी खाजन क्षेत्र भाडे पट्ट्याने मंजूर करून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे हे कोलंबी प्रकल्प आता फार्महाऊस बनत चालल्याचे दिसून आले आहे. डहाणूतील लोणीपाडा येथे अशाच प्रकारे भाजपच्या नेत्यांचे आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून प्रशासन देखील येथील बेकायदेशीर बांधकाम व कागदोपत्री असलेल्या कोलंबी प्रकल्पाची जागा ताब्या घेण्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
डहाणूत एका माजी आमदाराने आपल्या मुलाच्या नावाने मौजे लोणीपाडा येथील गट नंबर १६६ मधील १० हेक्टर क्षेत्र कोळंबी संवर्धनासाठी आपल्या पदरात पाडून घेतले होते. यातच लोकप्रतिनिधी म्हणून फायदा उचलत शासनाने मंजूर करण्यात आलेल्या जमिनीपेक्षा अधिक जागेवर कब्जा केला असल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला होता. कोलंबी संवर्धनासाठी जागेचा वापर होत नसल्याने जमिनीचे आदेशातील शर्तीचा भंग केल्यामुळे कारवाई बाबत उपविभागीय अधिकारी डहाणू यांनी तहसील डहाणू यांना २८ नोव्हेंबर २०१९ रोजी आदेश दिले होते. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे आजवर या बेकायदेशीर व कागदोपत्रीच असलेल्या कोलंबी प्रकल्पावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
डहाणू लोणीपाडा येथील गट नंबर १६६ मधील खाजण भाग व खाडी लगत असलेल्या कोलंबी प्रकल्पाच्या जागेवर भाजप नेत्यांचे आपले बस्तान बसवले असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. खाजगी रिसॉर्ट सारखे भलेमोठे फार्महाऊस उभारले असून याठिकाणी राजकीय पार्ट्यांची उठबस मोठ्या प्रमाणात असते. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असल्याने आपल्या पदाचा धाक दाखवून याठिकाणी सरकारी जमिनीवर उभारण्यात आलेल्या बांधकामांवर आजवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. खाजन जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याची परवानगी नसताना देखील भाजप नेत्यांचा पार्टी अड्डा मात्र दिमाखात उभा आहे. विशेष म्हणजे माजी आमदाराच्या मुलांच्या नावाने असलेल्या कोलंबी प्रकल्पाचा ताबा मात्र भाजपच्या नेत्यांकडे असल्याचे समोर आले आहे. असे असले तरी या अनधिकृत कोलंबी प्रकल्प व येथील बांधकामांवर महसूल विभाग कारवाई कधी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◾डहाणूतील लोणीपाडा येथे असलेल्या श्री. महालक्ष्मी ऍक्वा तर्फे मालक दिलीप कृष्णा घोडा यांना सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू यांच्या कडून १८ सप्टेंबर २०१७ रोजी जागेचा शर्त भंग बाबत नोटीस देण्यात आली होती.
◾दिलीप घोडा यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी यांना ३० ऑक्टोबर व ३ नोव्हेंबर २०१७ रोजी दोन वेळा पत्र देवून शर्त भंग करू नये यासाठी विनंती केली होती. परंतु यावेळी मे. ऍक्वा फिशरीज प्रो. दिलीप कृष्णा घोडा या कंपनीचा उल्लेख असलेला अर्ज असल्याचे दिसून येत आहे.
◾विशेष म्हणजे या कोलंबी प्रकल्प शर्त भंग प्रकरण सुरू असतानाच १२ ऑक्टोबर २०१७ रोजी दिलीप कृष्णा घोडा महालक्ष्मी ऍक्वा फार्मस रानशेत हस्ते भरत राजपूत यांनी कोलंबी महसूल जमिन भाडे भरल्याचे दिसून आले आहे. यामुळे हा कागदोपत्रीच असलेला कोलंबी प्रकल्पाची बेकायदेशीर मालकी आता भाजपच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांकडे तर नाही ना असा सवालला एकप्रकारे पुराव्यांची जोड लागली आहे.