सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कार्यालयात बसुन; ठेकेदारांच्या भरोशावर रस्ता
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला अंदाजपत्रक देण्यासाठी केली टाळाटाळ
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: ठेकेदारांच्या भरोशावर रस्ता सोडून कार्यालयात ठाण मारून बसणारे शाखा अभियंता मुळे डहाणू तालुक्यातील रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहेत. असाच एक प्रकार तालुक्यातील देदाळे – भेंडवड रस्त्याच्या कामामध्ये उघडकीस आला असून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम याठिकाणी करण्यात आले असून या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांन कडून करण्यात येत आहे.
कोलवली- देदाळे ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने चिंचणी वाणगाव मुख्य रस्ता ते भेंडवड गावाला जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम करण्याचे काम हाती घेतले होते. मागील वर्षी २०२४ मध्ये या रस्त्याच्या कामाची सुरुवात होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती. यातच हा रस्ता सुरूवाती पासून हा रस्ता खडीकरण झालेला असल्याने यावर पुन्हा मजबूत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाज पत्र मिळावं त्यामध्ये कामाची नेमकी काय तरतुद आहे. यासाठी कोलवली- देदाळे ग्रामपंचायत कडून जुलै २०२४ पासून अनेकदा अंदाजपत्रकाची मागणी करण्यात आली. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता काळे यांनी सरपंच यांना १२१ पानांचे कोणत्याही प्रकारची सही नसलेले निविदा पत्र हातात देऊन हेच अंदाजपत्रक असल्याची बतावणी केली होती. याबाबत उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग डहाणू यांच्या कडे ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा करूनही उप अभियंता यांनी ग्रामपंचायतीच्या तक्रारी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत पासून अंदाजपत्रक लपवून ठेवण्याची गरज काय असा सवाल उपस्थित होतो. ठेकेदारांच्या भरोशावर काम करणाऱ्या शाखा अभियंता यांनी ग्रामपंचायतीच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करत याठिकाणी पहिल्या पासून असलेल्या खडीकरण रस्त्यावर काही दिवसांपूर्वी मार्च २०२५ मध्ये पहिल्या आठवड्यात डांबराचा निकृष्ट दर्जाचा थर टाकून रस्ता बनविण्यात आला आहे.
ठेकेदाराने घाईगडबडीत बनवलेल्या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून काम सुरू असताना अधिकारी याठिकाणी फिरकले सुध्दा नाही. रस्त्यांचे काम सुरू असताना याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कामाबाबत माहिती देणारा फलक लावण्यात आलेला नव्हता. याठिकाणी टाकण्यात आलेला डांबर कार्पेट थर हा अतिशय पातळ असून त्याचा दर्जा ही निकृष्ट असल्याची तक्रार नागरिकांन कडून केली जात आहे. यामुळे या कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
◾काय चौकशी होणे गरजेचे..
रस्त्यावर डांबराचा थर टाकताना डांबराचे तापमान पाहणं गरजेचं याबाबत शाखा अभियंता यांनी प्रत्येक्ष जागेवर उभे राहून पाहणे आवश्यक.
रस्त्यावर टाकणाऱ्या डांबराचा नमुना प्रयोगशाळा मध्ये तपासणी साठी पाठवणे.
रस्त्यावर डांबराचा थर टाकताना तो योग्य जाडीचा आहे का याची त्याच वेळी तपासणी करून त्याबाबत फोटो घेणे.
एक क्युबिक मिटर खडी मध्ये किती किलो डांबर याची तपासणी करणे.
खडी करणावर डांबरीकरण करताना त्याठिकाणी लिक्वीड डांबराची फवारणी केली जाते की नाही याची तपासणी.