जागेवर तलावच नसल्याचे उघडकीस आल्या नंतर कारवाई आदेश दिल्यानंतर पुन्हा तडजोड करून दिली बेकायदेशीर रॉयल्टी
विरार वाला नाना मुख्य सुत्रधार
◾हेमेंद्र पाटील
गेल्या काही महिन्यांपूर्वी पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा घोटाळा समोर आला होता. डहाणू तालुक्यातील बावडा येथील तलावातील गाळ काढणे व खोलीकरण करण्यासाठी साडेआठ हेक्टर क्षेत्रात बेकायदेशीर केलेले उत्खनन बाबत पालघर दर्पण ने घेतलेल्या शोधात या जागी कुठल्याही प्रकारचे तलाव नसताना देखील बावडा ग्रामपंचायत व तलाठी यांनी बनावट पत्रव्यवहार करून शासनाची फसवणूक केली होती. यामध्ये ग्रामपंचायत, तलाठी ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अनेक अधिकाऱ्यांचे हात या घोटाळ्यात माखलेले असल्याचे उघडकीस आले होते. या नंतर पालघर जिल्हाधिकारी यांनी चौकशी चे आदेश दिले होते. परंतु या प्रकरणी चौकशी न होता खुद्द पालघर जिल्हाधिकारी यांनीच या तलावाच्या भ्रष्टाचारारात हात धुतल्याचे असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
बावडा परिसरात पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत पाझर तलावातील गाळ काढून खोली वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीने महत्त्वाचा विषय ग्रामपंचायत कार्यक्रम पत्रिकेवर न घेता कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी (२७ मार्च २०२३ रोजी) एका पाड्यावर ग्राम सभा आयोजित करून संबंधित विषयाला मंजुरी देण्यात आली. ग्रामसभेचे घाईघाईत आयोजन करण्यात आल्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये बनावट तयार केलेला प्रस्ताव डहाणूच्या तहसीलदारांकडे पुढील कार्यवाईसाठी पाठवण्यात आला होता. सर्वे नंबर ३०४/५२/१ या भूखंडाच्या ठिकाणी खरोखरच पहिल्या पासून तलाव होते का याचा शोध घेण्यासाठी पालघर दर्पण ने या जागेवर जाऊन गुगल मॅपची पाहणी केली असता याठिकाणी वर्षेभरापुर्वी कोणत्याही प्रकारचे तलाव तर सोडाच एक खड्डा देखील दिसून येत नाही.
तलाव प्रकल्पासाठी जिल्हा लघुपाटबंधारे विभागातील जलसंधारण अधिकारी यांनी ८५ हजार चौरस मीटर रुंद व पाच मीटर खोलीचा पाझर तलाव खणताना अस्तित्वात असलेल्या तलावाच्या पाच मीटर काठाच्या कडेची बाजू पूर्ववत ठेवण्याचे आदेशित केले होते. याचा अर्थ जिल्हा लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाव जागेवर नसताना कागदोपत्री तलाव असल्याचे दाखविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. विशेष म्हणजे सरकारी जागेवर तलाव असल्याचे कागदोपत्री दाखवून तसा पंचनामा करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार होऊन देखील कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही. उलट गेल्या दोन महिन्यांपासून या खोदाई केलेल्या मुरूम खाणीत पुन्हा तलाव गाळ काढायच्या नावाखाली सरकारी जागेवर मुरूम खोदाई साठी जिल्हाधिकारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत नियमबाह्य परवानगी दिली आहे.
पालघर जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांच्या कडून बेकायदेशीर कामांवर कारवाई होईल अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना असते. परंतु पालघर जिल्ह्यात जिल्हाधिकारी हेच अवैध कामांना प्राधान्य देत असल्याचे या घटनेनंतर दिसून येते. कागदोपत्री घोडे नाचविण्याचे काम मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात होत असताना राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी हे या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर मेहेरबान असल्याने अधिकाऱ्यांचे फावत चालले आहे हे मात्र नक्की आहे. यामुळे आता जनता दरबार आयोजित करून न्याय देणारे मंत्र्यांनी अशा विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
◾मुरूम खोदाई चा सुत्रधार
विरार येथील नाना नावाच्या एका मुरूम वाहतूक करणाऱ्या महाशयाने चक्क सरकारी जागेवर खोदकाम करून हा मुरूम रेल्वे भरावात विकण्याची शक्कल लढवली होती. यासाठी ग्रामपंचायत, स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी यांना हाताशी धरत थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्व मॅनेज करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला होता. महत्वाचे म्हणजे जिल्हाधिकारी यांनी ज्यावेळी चौकशी आदेश देत मुरूम खोदाई बंद केली त्यानंतर हा संपूर्ण विषय शांतपणे नियोजन बद्ध मार्गी लावण्याचे काम या विरार वाल्या नानाने केल्याचे समोर आले आहे.