◾मेलेल्या माणसाचे अवैध कुलमुखत्यारपत्र वापरून वाणगावच्या कोरे कुटुंबीयांनी खरेदी केली जमीन
◾ बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी केलेली जमीन पुन्हा विकताना साक्षीदार म्हणून पंकज कोरे यांची सही
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यातील आणखी एक जमीन घोटाळा समोर आला असून यामध्ये चक्क मेलेल्या माणसाच्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या जमीन घोटाळाप्रकरणात पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांच्या कुटुंबीयांचा समावेश असुन या प्रकरणी तक्रारदार यांनी गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिस अधीक्षक पालघर यांना पत्र दिले आहे.
डहाणू तालुक्यातील मौजे डेहणे येथील गट क्रमांक ८ क्षेत्र ४-१५.०० हे. आर क्षेत्राची जमीन मयत खातेदार धर्मा सुकऱ्या सावे यांच्या नावे असलेली जागा पैकी २-०१.०० हे. आर क्षेत्र जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मयत असलेल्या धर्मा सुकऱ्या सावे यांनी आपल्या जागेचे कुलमुखत्यार पत्र भानुदास रघुनाथ सावे यांना दिले होते. परंतु धर्मा सावे यांचा मृत्यू झाल्यावर जागेचे पैसे लाटण्याच्या उद्देशाने मयताच्या २४ दिवसातच अवैध असलेल्या कुलमुखत्यार पत्राच्या आधारे आपसात संगणमत करून ही जागा वाणगाव येथील कोरे कुटुंबीयांना विकल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आपल्या जागेची विक्री झाली याबाबत कालांतराने माहिती पडल्यावर तक्रारदार गीतांजली सावे यांनी पाठपुरावा सुरू केला यावेळी त्यांना मिळालेली कागदपत्रे व धर्मा सुकऱ्या सावे यांचा मृत्यू दाखला यावरून आपल्या कुटुंबाची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मौजे डेहणे येथील बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केलेली जागा सावे कुटूंबाचे सामईक मालकीची जमीन व यातील तक्रारदार गीतांजली सावे यांचे सासरे हरिश्चंद्र सुक-या सावे, धर्मा सुकऱ्या सावे व अन्य खातेदार यांचे सामाईक मालकीची व कब्जेवहिवाटीची असून त्यांचे जमीनीचे सहहिस्सेदार धर्मा सुकऱ्या सावे हे १ फेब्रुवारी १९९८ रोजी मयत झाले होते. असे असतानाही सन १९९८ रोजी सदरहू जमीनीचे ७/१२ दप्तरी हरिश्चंद्र सुकऱ्या सावे, धर्मा सुकऱ्या सावे, हरेश्वर सुकऱ्या सावे व इतर यांची नावे मालक व कब्जेदार ७/१२ सदरी नोंद होती. परंतु भानुदास रघुनाथ सावे यांनी वृषाली दिनेश कोरे व तिची आई दिपा दिनेश कोरे यांच्या सोबत आपसांत संगनमत करून सदरची जमीनी व अन्य जमीनीचे, जमीन मालकांचे नावाचे खोटे व बोगस कुलमुखत्यार पत्र तयार करून २-०१.०० हे. आर क्षेत्राच्या जमीनचे कुलमुखत्यार धारक असल्याचे भासवून भानुदास रघुनाथ सावे यांनी २४ फेब्रुवारी १९९८ रोजी कोरे कुटुंबीयांना बेकायदेशीर दुय्यम निबंधक डहाणू यांच्या कडे नोंदणी करत ही जागा विक्री केली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी केलेली जागा भविष्यात अडचणीची ठरू नये यासाठी २९ मार्च २००७ रोजी डिड ऑफ कन्व्हेयन्स या दस्तऐवजाने ऍबी जॉर्ज यांना विक्री केली आहे. ही विक्री करताना साक्षीदार म्हणून दिपा दिनेश कोरे यांचा मुलगा व वृषाली दिनेश कोरे यांचा भाऊ तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे यांची सही दिसून येते. तक्रारदार गीतांजली सावे यांनी भानुदास सावे तसेच वृषाली दिनेश कोरे व तिची आई दिपा दिनेश कोरे, ए. बी. जॉर्ज यांनी केलेल्या बेकायेदशीर कृत्याबाबत त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई मागणी केली असून पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत कागदोपत्री पुरावे ही जोडलेले आहेत.
◾सदरची जमीन १९७४ च्या महाराष्ट्र विस्थापितांचे पुनर्वसन अधिनियमाच्या खाली अधिसूचित झाली आहे. यामुळे सन १९९८ व २००७ रोजी खरेदी विक्री करताना शासनाची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही.
◾जागेची खरेदी झाल्यावर सातबारा फेरफार करताना जागा मालकांना तलाठी नोटीस पाठवून जागेच्या सातबारा फेरफार बाबत माहिती देवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असते. परंतु धर्मा सावे हे मयत असताना सातबारा फेरफार ची सन १९९८ रोजी तलाठी यांनी नोटीस कोणाला बजावली होती.