◾ कोरोना रुग्ण बोईसर मध्ये आढळल्याने बोईसर परिसर 14 दिवस बंद; कोरोना पाँजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने तपासणी साठी
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: लाखोंच्या घरात लोकसंख्या असलेल्या बोईसर भागात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. संचारबंदी जुगारून बोईसर भागात नेहमीच नागरीक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गर्दी करून दिसताना पाहावयास मिळत होते. मात्र रविवारी येथील मुंबई प्रवास झालेल्या इसमाला कोरोनाची लागण झाली हे उघड झाल्यानंतर संपूर्ण बोईसर खऱ्या अर्थाने लाँकडाऊन झालेले पाहावयास मिळाले. येथील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले असुन बोईसर भागात प्रवेश करण्यास मज्जाव केला जात आहे.
बोईसर दलाल टाँवर येथील एक 35 वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाल्याने रविवारी रात्री पासुनच इसम राहत असल्या इमारती मधील 10 लोकांना तपासणी साठी ताब्यात घेतले होते. तसेच याभागात जाणारा रस्ता बंद करून कोणालाही बाहेर जावु दिले जात नव्हते. यातच सोमवारी सकाळी पासुनच बोईसर पोलिसांनी बोईसर भागातील प्रमुख रस्ते बंद करत दलाल टाँवर परिसरातून जाणारा बोईसर तारापुर रस्ता पुर्ण पणे सिल करण्यात आला. कोरोना रुग्ण आढळून आल्याने हा भाग आता सुमारे 14 दिवस बंद राहणार आहे. बोईसर तारापुर मुख्य रस्त्यावर सिडको नाक्या रस्ता, चित्रालय पोलीस चौकी मुख्य रस्ता या दोन ठिकाणी मुख्य रस्ता पुर्ण पणे बंद असल्याने नागरीकांना याठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच बोईसर मध्ये प्रवेश करण्यासाठी असलेल्या बेटेगाव येथील मुख्य चौकीवर वाहनांची कसुन तपासणी केली जात असुन मुंबई ठाण्याहून कोणी आले आहे का याबाबत खबरदारी घेतली जात आहे. यातच बोईसर भाजी मार्केट व इतर दुकाने पाच दिवस बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायती कडुन घेण्यात आला आहे. तर नागरीकांनी घराबाहेर पडु नये त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन बोईसर पोलिसांन कडुन करण्यात आले आहे.
◾ दलाल टाँवर भागात कोरोना रुग्ण आढळून आल्याने याठिकाणी राहणारे काही लोकांनी रात्रीच पळ काढुन दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेल्याचे समोर आले आहे. अशा लोकांना वैद्यकीय अधिकारी यांनी घरीच राहण्याचा सल्ला दिला असुन त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे.
◾ संचारबंदी जुगारून मुंब्र्यातुन कुटूंब बोईसर मध्ये
संचारबंदी असताना व नाक्या नाक्यावर पोलीस तपासणी असताना बोईसर ओत्सवाल मध्ये मुंब्र्यातुन एक कुटुंब आले आहे. रविवारी रात्री इथल्या लोकांनी एकच गोंधळ घातल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या लोकांना आरोग्य विभागाने घरीच अलगीकरण करून राहण्यासाठी सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे बोईसर मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर प्रशासन जागे झाले असुन आता संचारबंदी काटेकोरपणे पाळली जात आहे.
◾ आरोग्य विभागाचे 35 कर्मचारी बोईसर भागात
बोईसर भागात कोरोनाने शिरकाव केल्याचे उघड झाल्यानंतर याठिकाणी आरोग्य विभागाचे 35 कर्मचारी वेगवेगळ्या भागात जावून घरात असलेल्या लोकांची माहिती घेणे, कोणाला कोणता आजार तसेच कोरोना बाबत काही लक्षणे आहेत का याचा तपास सुरू केला आहे.