- पालघर जिल्ह्यात रेशनिंग तांदळाचा काळाबाजार वाढला; शासकीय योजनेतील तांदूळ विक्रीसाठी बाजारात
पालघर दर्पण: वार्ताहर
विक्रमगड: तालुक्यातील कोंडगाव येथे एका घरातुन एक पिकपमध्ये शासकीय योजनेमधील तांदळाचा काळाबाजार करत असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत पुरवठा अधिकारी यांनी धाड टाकत कारवाई करण्यात आली आहे. यामुळे रेशनिंग चा काळाबाजार पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात उघड झाला आहे.
शासकीय योजनेतील तांदूळ कोंडगाव येथून एका घरातून गोणी भरल्या जात असल्याची माहिती कोंडगाव गावचे मंजू कोम व ग्रामस्थांनी विक्रमगड तहसीलदारांनी दिली असता सदर ठिकाणी पुरवठा अधिकारी पुंडलीक पाटील यांनी येऊन तपास केला असता सदर तांदूळ हा रास्त धान्य दुकानातील असल्याचे निदर्शनात आले. सदर गाडी कासा पोलीस ठाण्यात आणून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोंडगाव येथील ताराचंद जोशी हा तांदळाचा व्यापारी असून त्याच्या घरामध्ये अनेक वर्षांपासून तांदळाचा माल उतरविला जात आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तो रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करत असल्याची ग्रामस्थांना शंका होती. दरम्यान काल 2 मे रोजी रोजी कोंडगाव गावातील ग्रामस्थांसह सरपंचांना सकाळी 9.30 च्या दरम्यान 25 -25 किलो वजनाच्या 100 गोणी तांदळाच्या गोणी घरातून पिकअपमधे भरत असल्याचे समजल्यावर त्यांनी याबाबत विक्रमगड तहसीलदारांना माहिती दिली.
विक्रमगड तहसीलदार यांनी तत्काळ विक्रमगड तालुका पुरवठा अधिकारी पुंडलिक पाटील यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. पाटील यांनी आलोंडा सजेचे तलाठी श्रद्धानंद विश्राम गायकवाडयांना बरोबर घेत सदर ठिकाणी
गेले असता त्यांना तेथे 60 हजार किमतीच्या 100 गोणी तांदूळ तसेच 1 लाख 30 हजार किमतीची महेंद्रा पिकअप असे आढळून आले. सदरचा पूर्ण तपास केला असता सदर तांदूळ खरेदीचे कोणतेही बिल अथवा पावत्या त्यांना मिळाल्या नाहीत. त्या अनुषंगाने सदर तांदूळ हे शासनाच्या रास्त धान्य दुकानातील असल्याचे संशय असून हा अवैध तांदूळ साठवण केल्याप्रकरणी सदर पिकअपचा चालक शिवराम पाटील (वय 27, रा.खामलेलो,ता.-पालघर) व ताराचंद जोशी(रा.कोंडगाव,ता-विक्रमगड) जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास कासा पोलीस करत आहेत.
कोंडगाव हे कासा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने या बाबत कासा पोलीस स्टेशन मधे अत्यावकश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. असुन पुढील कार्यवाही सुरु आहे..
-श्रीधर गालीपेल्ली
(विक्रमगड तहसीलदार)