पालघर गडचिंचले हत्याकांडानंतर झोपलेली पालघर सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. यामुळे आता उशिरा का होईना पोलीस अधीक्षक यांनी आपल्या फौजेला अनेक प्रकारची एक दिवशीय प्रात्यक्षिके देण्याचा निर्णय घेतला होता. याच नुसार जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानंतर दंगल विरोधी कारवाई व जमावावर नियंत्रण आणण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले होते. यामुळे अनेक वर्षानंतर हत्यारे कशी चालवायची व त्यांचा आवाज कसा येतो याचा अनुभव पोलिसांना घेता आला आहे.
गडचिंचले येथे साधुंवर जमावाने केलेला हल्ला त्यात पोलिसांच्या समोर साधुंची निर्घृणपणे केलेली हत्या यामुळे पालघर पोलीस देशभरात बदनाम झाले आहेत. जमावाने पोलिसांवर हल्ला करून देखील पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. यातच हत्यारे असुन सुध्दा त्याचा वापर करण्याचे धाडस पालघर पोलिसांन मध्ये झाले नसल्याने निष्पापांनी आपला जिव गमवला आहे. पोलीस हा जनतेच्या रक्षणासाठी असला तरी गडचिंचले येथे पोलिसांनी आपले रक्षण करत साधुंना जमावाच्या हवाली केले होते. त्यानंतर देशभरात टिकेची झोड उठल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी काही अधिकाऱ्यांचे निलंबन तर काही लोकांच्या बदल्या करून आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील सुरक्षाव्यवस्था अतिशय खिळखिळी झाली असताना देखील मुख्य अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. यातच अफवेतुन हत्या झाल्याचा कांगावा सरकार कडुन वेळोवेळी करण्यात आला.
पालघर पोलिसांचे गुटका, गावठी दारू, जागेची प्रकरणे याशिवाय इतर गोष्टींकडे दुर्लक्ष असल्याचे गडचिंचले प्रकरणानंतर दिसून आले आहे. ग्रामीण भागात फुटीरतावादी संघटना कडुन केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कारवायांवर पोलिसांचे खरच लक्ष नाही की दुर्लक्ष केले जाते हा मोठा प्रश्न आहे. धर्माविरुद्ध सीमा भागात भडकवले जात असुन हिंदू विरोधी कारवाया केल्या जात आहेत. यातच धर्मांतर देखील मोठ्या प्रमाणात होत असताना जिल्ह्यातील गुप्तचर विभागाने याबाबत कोणता अहवाल शासानाकडे आजवर सादर केला आहे का हे देखील महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात फुटीरतावादी संघटनाकडुन केल्या जाणाऱ्या कारवाया याबाबत पालघर पोलीस अधीक्षक यांना कल्पना नव्हती की याविषयाला अधिक महत्त्व दिले नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. फुटीरतावादी संघटनाकडुन येणाऱ्या काळात होणारे धोके यामुळे आता उशिरा का होईना पोलिसांना प्रात्यक्षिक घेवुन प्रशिक्षण देण्याचे धडे गिरवले जात आहेत.
पोलीस अधीक्षक यांनी आपल्या फौजेला शस्त्राचा वापर कसा करावा त्यांनी खरच अशी शस्त्र याअगोदर हाताळणी केली आहेत का याबाबत अभ्यास करणे गरजेचे आहे. पोलिसांनी घेतलेली दंगल विरोधी कारवाईची प्रात्यक्षिक याचा याअगोदरच धडा घेतला असता तर गडचिंचले येथील हत्या झालेल्या साधुंचा जिव वाचवता आला असता. यातच महत्त्वाचे म्हणजे गडचिंचले येथे पोचण्यासाठी निघालेली एक पोलिसांची गाडी सेलवास भागात गेली होती. त्यागाडीला देखील तेथील जमावाने अडविल्यानंतर त्या गाडीला सोडविण्यासाठी पालघरचे पोलीस उपाअधिक्षक विक्रांत देशमुख याठिकाणी गेले होते. मात्र जमावाने त्यांच्या वाहनावर देखील लोखंडी राँड फेकून हल्ला चढवला होता. त्या हल्ल्यात विक्रांत देशमुख थोडक्यात बचावले होते. परंतु पालघर पोलिसांन कडुन प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोट मध्ये या घटनेचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसल्याने आपली नाचक्की लपविण्याचा हा केलेला प्रयत्न तर नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे खिळखिळी झालेली पालघर सुरक्षा यंत्रणेकडे गृह विभाग काय उपाययोजना करते हे फक्त पाहातच राहावे लागणार आहे.
— हेमेंद्र पाटील,संपादक पालघर दर्पण