- वर्ल्ड वाईन, अमन वाईन दुकानाबाहेर तुफान गर्दी; वैयक्तिक मद्य विकत घेण्याचे परवाने नसताना देखील अधिकाऱ्यांंच्या संगणमताने मद्याची विक्री
पालघर दर्पण:विषेश प्रतिनिधी
बोईसर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेवुन बोईसर मधील मद्य विक्रेत्यांनी मंगळवारी बेकायदेशीर पणे मद्य विक्री केली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात गर्दी वाईन शाँप बाहेर पाहावयास मिळाली होती. यातच मद्य खरेदी करणाऱ्या तळीरामांन कडे कोणत्याही प्रकारचे मद्य खरेदीचा परवाना नसताना देखील मोठ्या प्रमाणात मद्य विक्री अधिकाऱ्यांच्या संगणमताने करण्यात आल्याचे दिसुन आले.
कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी बोईसर नेहमीच अग्रेसर असल्याचे महिन्याभर चाललेल्या संचारबंदी मध्ये दिसून आले आहे. यातच आता मद्य विक्री दुकाना बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना देखील पोलिसांनी देखील कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. बोईसर येथील अमन वाईन व वर्ल्ड वाईन याठिकाणी तळीरामांना मद्य पिण्याचा व विकत घेण्याचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना देखील याठिकाणाहून मद्याची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यातच वर्ड वाईन याठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक वैभव वैद्य हे खुर्ची टाकुन बाहेर बसलेले होते. परवाना नसताना करण्यात येणारी मद्य विक्री याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार देत आपण आमच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत बोलावे त्यांनी सांगितले तर दुकाने पुन्हा बंद करू असे गजब उत्तर देत एकप्रकारे बेकायदेशीर पणे सुरू असलेल्या मद्य विक्रीला समर्थ केले आहे.
संचारबंदी काळात बोईसर भागातून मोठ्या प्रमाणात चोरट्या पध्दतीने मद्यविक्री करण्यात आल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये उघड झाले होते. यातच बोईसर भागातील मद्य विक्री दुकाने खुली करण्यापूर्वी त्यांचा मद्याचा साठा व मद्य विक्री करण्यात येणाऱ्या पुस्तकात केलेली नोंद याची योग्य तपासणी व्हावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार अनेकांनी जिल्हाधिकारी पालघर व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांच्या कडे केली होती. मात्र तरी देखील याबाबत कोणत्याही प्रकारची दखल न घेताच मंगळवारी सकाळी मद्य दुकाने खोलण्यासाठी परवानगी देण्यात आली. यामुळे चोरट्या मद्य विक्री साठी राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील पाठीशी घातल असल्याचा आरोप अनेकांन कडुन करण्यात येत आहे. असे असले तरी शासनाला महसूल मिळत असल्याने बेकायदेशीर पणे नियमांना बगल देत मद्य विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग मेहरबान असल्याचे दिसून येते. यातच सायंकाळी पाच वाजता बोईसर मधील सर्व मद्य विक्री दुकाने बंद झाली असताना देखील वर्ल्ड वाईन याठिकाणी 5:40 पर्यंत विक्री सुरू ठेवण्यात आली होती.
◾ अचानक दुकाने सुरू झाल्याने मद्य पिण्याचे परवाने अनेकांन कडे नसल्याने सद्या मद्य दिले जात असेल. तात्पुरता परवाने देखील संपले असल्याने आता वेळेवर उपलब्ध होत नाही. यामुळे सद्या मद्य विक्री केली जात आहे. तरी परवाने मिळावे यासाठी प्रयत्न करू, तसेच संचारबंदी मध्ये विक्री करण्यात आलेल्या मद्य विक्री बाबत तपासणी करण्यात येईल.
— विजय भुकन, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर