दीपक मोहिते
गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या हिंसक दंगलीनंतर दिल्ली पुन्हा रुळावर आली आहे. ज्या परिसरात उद्रेक झाला,तेथील जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे. या दंगलीचे पडसाद काल लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहात उमटले. विरोधकांनी दंगलीचा प्रश्न उपस्थित करून गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला,सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या खासदारांची मजल एकमेकांना धक्काबुक्की करण्यापर्यंत गेली. या दंगलीत सुमारे ५० नागरिक मृत्युमुखी पडले. त्यांच्या कुटुंबियांची अवस्था, दंगली मागची कारणे हुडकून काढणे, या दंगलीना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, यावर चर्चा करण्याऐवजी जे काही घडले त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच…या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. हा सर्व गोंधळ पाहता आपले लोकप्रतिनिधी किती संवेदनशील आहेत,हे स्पष्ट झाले. या दंगलीत जे नागरिक मृत्युमुखी पडले,त्यांच्या पीडित कुटुंबियांना आधार देण्याऐवजी दोन्ही पक्ष एकमेकांच्या उरावर बसतात,हे चित्रच आपल्या लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.