53 एटीएम कार्डासह लाखोंचा मुद्देमाल जप्त
पालघर दर्पण वार्ताहर
नालासोपारा: एटीएममध्ये पैसे काढायला जाणाऱ्या लोकांची दिशाभूल करून त्यांचे एटीएम कार्डची हातचलाखीने बदली करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या टोळीला वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. त्यांच्याकडून 15 गुन्हे उघड करून 53 एटीएम कार्ड जप्त करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेकडील रतनदीप स्टुडिओ जवळील चिंचोटी गावातील गोडात पाडा येथे इंद्रकुमार बिहारी शाहू (28) याची सोमवारी 24 फेब्रुवारी 2020 ला दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास वसई फाटा येथील महानगरपालिकेच्या परिवहन बस स्टॉपच्या पाठीमागील ऍक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये गेला होता. सदर ठिकाणी असलेल्या आरोपीने इंद्रकुमार याला माझे कार्ड खराब झाले असून तुझे कार्ड दाखव, बघूया ते ह्या मशीनवर चालते का ? असे बोलून त्याचा विश्वास संपादन करून त्याचे एटीएम कार्ड बदलून त्याच्या खात्यातून चार हजार रुपये काढून दोन आरोपींनी फसवणूक केली होती. वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली. राजवीर हसमुख भट (28) आणि जितेंद्र अखिलानंद तिवारी (37) या दोघांना पकडले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकेचे 53 एटीएम कार्डसह चार लाख 24 हजार 220 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या दोघा आरोपींनी गुजरात राज्यात 10 ठिकाणी व महाराष्ट्रात पाच ठिकाणी असे प्रकार उघड केल्याचे सांगितले आहे.
◼वसई न्यायालयात हजर केले असता दोन आरोपींना 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण आपल्या हद्दीमध्ये दोन गुन्हे यांनी केलेले असल्याने परत कोर्टाकडून यांचा ताबा घेणार आहे.
- ज्ञानेश फडतरे, सहायक पोलिस निरीक्षक गुन्हे प्रकटीकरण शाखा, वालीव