■ जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व कृषी विज्ञान केंद्रे निर्माण करा- जि.प. उपाध्यक्ष निलेश सांबरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पालघर दर्पण विषेश प्रतिनिधी
मुंबई: पालघर जिल्हा हा आदिवासी व मागासबहुल जिल्हा असून मुंबईपासून काही अंतरावर वसलेला आहे. मात्र मुंबईच्या तुलनेने विकासाच्या दृष्टिकोनाने पाहता पालघर जिल्हा अनेक सोयी-सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय आणि शैक्षणिक गरजा लक्षात घेता जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व कृषी विज्ञान केंद्राची तातडीने निर्मिती करावी, अशी मागणी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक तसेच पालघर जि प. उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
पालघर जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यू, स्त्रीयांचे आजार, बालरोग, गंभीर आजार यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय किंवा मोठे जिल्हा रुग्णालय नसल्याने नागरिकांना उपचारांसाठी सिल्वासा, नाशिक वा ठाणे – मुंबई येथे जावे लागते. अनेक रुग्ण उपचारांअभावी मरण पावतात. तसेच खर्चाच्या दृष्टिनेही ते न परवडण्यासारखे आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यामुळे अत्यावश्यक गरज म्हणून पालघर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्याची गरज आहे. जेणेकरून आदिवाशी व शेतकरी समाजाची वैद्यकीय व शैक्षणिक समस्या दूर होतील. तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टिने शेतीवर विविध प्रयोग करता यावेत व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पालघर जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्राचीही निर्मिती होणे आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान ऊंचावण्यासही मदत होईल. या वैद्यकीय महाविद्यालय व कृषी विज्ञान केंद्राच्या निर्मितीसाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
◼पालघर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे ही आपली मुख्य गरज आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र आणि बाजार समित्या झाल्या तर येथील नागरिकांच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन होऊ शकते. त्यामुळेच जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र आणि बाजार समित्या होण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत.
— निलेश सांबरे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष, पालघर