तारापुर मधील बजाज हेल्थ केअर कारखानदाराचा प्रताप उघड; अंधाराचा फायदा घेवुन रात्रभर रसायन सोडले जाते नाल्यात
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: देशभरात प्रदुषणामध्ये नावलौकिक मिळवलेल्या तारापुर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक कारखान्यांचे प्रदुषण सुरूच आहे. कोणत्याही विभागाची भिती उरलेली नसल्याने याठिकाणी रात्रीच्या वेळी घातक रसायन चक्क कारखान्याच्या बाहेर असलेल्या नाल्यात सोडले जाते. येथील एका प्रदुषणकारी कारखान्यांने घातक रसायन सांडपाणी वाहुन नेणाऱ्या वाहिनीत व नाल्यात सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र याबाबत नागरीकांनी प्रदुषण विभागाला तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
प्रदुषणकारी तारापुर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नं- इ 62/63 या बजाज हेल्थ केअर लि. कारखान्यातुन बाहेर असलेल्या नाल्यात व औद्योगिक क्षेत्राचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत रात्रीच्या वेळी घातक रसायन सोडले जात असल्याचे उघड झाले आहे. रात्री उशिरा कोणी नसल्याचे पाहुन मोठ्या प्रमाणात रसायन नाल्यात सोडुन दिले जात आहे. याबाबत एक विडीओ समोर आला असुन प्रदुषण करणाऱ्या बजाज हेल्थ केअर कारखान्यांचा पर्दाफाश झाला आहे. ज्या 20 मेे च्या रात्री बोईसर पोलिसांनी न्यूट्राँप्लस व आताची बजाच हेल्थ केअर कारखान्याचा रासायनिक घनकचरा घेवुन जाणारा ट्रक ताब्यात घेवुन सोडुन दिला त्याच रात्री बजाज कारखान्याने नाल्यात घातक रसायन सोडल्याचेे समोर आले आहे.
बजाज हेल्थ केअर कारखान्यातुन एक लहान प्लास्टिक पाईप बाहेर काढुन घातक रसायन सोडताना विडीओ चित्रीकरणात दिसुन येत आहे. कारखान्यात उत्पादन प्रक्रिया झाल्यानंतर निघणारे रसायन हे प्रक्रिया करण्यासाठी मुंबई वेस्ट मँनेजमेंट येथे पाठविणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र तेथील खर्चिक प्रक्रिया पासुन वाचण्यासाठी कारखानदार अशा प्रकारे नाल्यात घातक रसायन सोडत असल्याचे दिसून आले आहे. यातच प्रशासनाला हाताळणाऱ्यात तरबेज असलेले कारखानदार व केमिकल माफियांना कोणाचीही भिती उरलेली नाही. यामुळे अशा प्रदुषणकारी कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परंतु आता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे प्रदुषणाने हात भिजल्याने नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे औचित्यांचे ठरेल.