- पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात वनवास सुरूच; विहिरीत उतरून पाणी भरताना महिला पडली पाणी नसलेल्या विहिरीत
पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: तालुक्यातील वरसाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नवापाडा या गावातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून अपघात घडला. ज्यात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना काल मंगळवारी (19 मे) रोजी घडली.
राही किनर ही महिला मंगळवारी सायंकाळी विहिरीवर पाणी भरण्यासाठी आली होती. भीषण पाणी टंचाई या गावात असल्याने महिलांना विहिरीत उतरून पाणी काढावे लागते. ही महिला विहिरीत उतरत असताना तोल जाऊन विहिरीतील खडकावर आदळून गंभीर जखमी झाली. तिच्या कमरेला जबर इजा झाली असून तिला तात्काळ ग्रामस्थानी विहिरीतून बाहेर काढून वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र तिला गंभीर दुखापत झाल्याने सायन रुग्णालय मुंबई येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
नवापाडा या गावात टँकर सुरू करावे अशी मागणी करणारा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे. नवापाडा या गावात भीषण पाणी टंचाई असून विहिरीत घोटभर मिळेल इतके पाणी उपलब्ध असल्याने येथे लोक गर्दी करतात. या घटनेबाबत तात्काळ चौकशी करून निष्काळजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच तात्काळ टँकर सुरू करावे अशी मागणी केली जात आहे.
◾दरम्यान या महिलेच्या शस्त्रक्रियासाठी व अन्य येणारा दवाखान्यातील सर्व खर्चाची तयारी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी उचलला असुन दवाखान्यातील काही खर्चासाठी काही रक्कमही या रुग्णाच्या नातेवाईकांकडे देण्यात आली आहे.