पालघर दर्पण: रमेश पाटील
वाडा: अंबाडी ग्रामपंचायत हद्दीतील उंबरपाडा येथे गेल्या दोन दिवसांत करोना बाधित दोन रुग्ण आढळल्याने या ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने ३० मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय येथील ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. मात्र असे असताना अंबाडी नाक्यावर असलेला वाईन शॉप सुरूच आहे.
अंबाडी नाक्यावर कोरोनाचा धोका निर्माण झाला असताना हे वाईन शॉप सुरू केल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे, विशेष म्हणजे अत्यावश्य सेवा, गरीब दुबळ्या शेतकऱ्यांचा भाजीपाला, किरकोळ किराणा दुकान हे मात्र बंद ठेवले आहेत, ग्रामपंचायत अंबाडीचे ग्राम विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी वाईनशॉप बंद करणे बाबत नोटीस देऊनही वाईन शॉप मालक नोटीस स्वीकारत नसल्याने शनिवारी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत प्रशासन यांनी जाऊन दुकानाला नोटीस चिकटवून पंचनामा केला.
याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने रेड झोन डिक्लेर करावे आणि आवश्यक ती काळजी घेऊन गर्दी होणार नाही याची खबरदारी बाळगावी अन्यथा जनतेच्या संतापाचा उद्रेक होईल असा इशारा श्रमजीवीचे पदाधिकारी प्रमोद पवार यांनी दिला आहे.