◾ टाळेबंदीत बंद कारखान्यांमुळे दांडी नवापूर खाडीतील प्रदुषण झाले होते कमी; मात्र प्रदूषणकारी कारखाने सुरू होताच खाडीतील मासे मारू लागले
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: प्रदुषणकारी कारखाने सुरू होताच दांडी नवापूर खाडीतील मासे मोठ्या प्रमाणात मेलेले आढळून आले आहेत. टाळेबंदीत कारखाने बंद असताना यावेळी खाडीतील प्रदुषण पुर्ण कमी झाल्याने याठिकाणी मासेमारी केली जात होती. मात्र टाळेबंदीतील नियमांमध्ये शिथीलता करत शासनाने कारखाने सुरू केल्याने तारापुर मध्ये पुन्हा प्रदुषण वाढल्याने त्याचा विपरीत परिणाम खाडीमधील माशांवर झाला आहे.
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातुन निघालेले रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच समुद्रात सोडले जाते. याठिकाणी असलेले सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र देखील फक्त दिखाव्यासाठी असल्याचा आरोप नागरीकांन कडुन केला जात आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच घातक रासायनिक सांडपाणी थेट खाडी भागात येत असल्याने दांडी नवापूर खाडीत मोठ्या प्रमाणात केमिकल मिश्रीत रंगबेरंगी सांडपाणी दिसून येत आहे. रासायनिक सांडपाणी मोठ्या प्रमाणात खाडी भागत येत असल्याने यामुळे खाडीमधील मासे मृत अवस्थेत किनाऱ्यावर व खाडीतील पाण्यात तरंगत असल्याचे शुक्रवारी सकाळी दिसुन आले. नेहमी प्रमाणे मच्छीमारांनी याबाबत तक्रारी संबंधित विभागांना देखील केल्या परंतु त्यांचा कोणताही उपयोग होत नाही. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत असल्याचा आरोप केला जात आहे.
संचारबंदीत कारखाने बंद असल्याने दांडी नवापूर खाडीचे पाणी अतिशय स्वच्छ झाले होते. गेल्या 10 वर्षात कधी न दिसणारे लहान लहान मासे याठिकाणी दिसु लागले होते. समुद्रातील मासेमारी बंद असताना मच्छीमारांनी खाडीमधील मासेमारी करून आपला उदरनिर्वाह चालवला होता. मात्र आता प्रदुषणकारी कारखाने सुरू झाल्याने त्याचा विपरित परिणाम खाडीतील मासेमारी वर होऊ लागला आहे. रासायनिक घातक सांडपाण्यामुळे समुद्रातील पाण्यामधील प्राणवायू कमी होत असल्याने माशांचा मृत्यू होत आहे. यातच खाडीमध्ये आठ दिवसात वाढलेले प्रदुषणामुळे खाडीमधुन मासेमारी करून मच्छीमार करत असलेला उदरनिर्वाह आता बंद झाला आहे. यामुळे रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर व सामुहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांन कडुन केली जात आहे.
◾ औद्योगिक क्षेत्रातील 25 एमएलडी सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात 40 एमएलडी पेक्षा अधिक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी येते. कमी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र असल्याने रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच सांडपाणी समुद्रात सोडले जाते. याअगोदर हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु प्रदुषणकारी कारखान्यांना वाचविण्यासाठी शासनाने सांडपाणी प्रक्रिया केंद्राला पुन्हा मोकळीक दिली.
◾रासायनिक प्रदुषणामुळे कोणते मासे झाले नष्ट
बोयमच्छी, कोळंबी, निवटी, नावेरी, कोलिम, शिवल्या, खेकडे, टोड, सरबट, केटफिश (चिमण्या, माडू, शिंगाडी)
प्रतिक्रिया
संचारबंदीत कारखाने बंद असताना दांडी नवापूर खाडीतील प्रदुषण अतिशय कमी झाले होते. परिणामी याठिकाणी मासेमारी करून लाँकडाऊन मध्ये मच्छीमार आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र प्रदुषणकारी कारखाने पुन्हा सुरू झाल्याने खाडीत मोठ्या प्रमाणात मेलेले मासे दिसून येतात. अनेकदा तक्रारी करून देखील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे बेजबाबदार अधिकारी प्रदुषणकारी कारखान्यांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नाही.
— कुंदन दवणे, सदस्य, अखिल भारतीय मांगेला समाज परिषद