◾ हेमेंद्र पाटील
तारापुर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने असल्याने याठिकाणी केमिकल माफिया व भंगार माफियांचे राज सुरू आहे. यांचा दरारा एवढा वाढलेला आहे की आता पोलिस देखील हतबल झाल्याचे दिसून येते. त्यांचे कारण देखील तसेच असुन या माफियांना साथ आहे ती स्थानिक नेत्यांची यामुळे मग त्यांच्या विरोधात कोणी गेले तर सर्व नेते पोलिस ठाण्यात जावुन दबाव तंत्र आणत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. काही प्रमाणात पोलिस देखील अशा माफियांन पासुन दुरच राहताना दिसत असुन याचे कारण नेमके काय हे आता नवीन आलेल्या पोलिस अधिक्षक यांनीच शोधलेले तर बरे होईल.
रासायनिक कारखान्यातुन निघणारा घातक घनकचरा व रसायन हे मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे पाठवणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र हा खर्चिक प्रवास वाचविण्यासाठी कारखानदार भंगारमाफियांना हाताशी घरून या घनकचऱ्यांची नैसर्गिक नाल्यात किंवा जंगल भाग असलेल्या ठिकाणी विल्हेवाट लावतात. आता हे काम एवढे सोपे पण नाही कारण औद्योगिक क्षेत्राबाहेर निघताना प्रत्येक ठिकाणी पोलीस तपासणी नाके आहेत. तरी देखील ही वाहने रासायनिक घनकचरा कसा घेवुन जातात हा प्रश्न निर्माण होत असेल. मात्र अशी वाहने चौकीवरून पास करण्यासाठी विषेश यंत्रणा काम करत असते. एक माणूस पहिलाच पुढे जावून चौकीवर नियोजन करतो आणि वाहनांची कोणत्याही प्रकारची तपासणी न करताच घातक रसायन व रासायनिक घनकचरा घेवुन मालवाहू वाहणे बिनधास्तपणे पुढचा प्रवास करतात.
बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अवधनगर येथे भंगार माफिया अशा प्रकारे घातक रसायन व घनकचऱ्यांची विल्हेवाट लावण्याचे काम करतात. हे आजवर झालेल्या कारवाई मध्ये देखील उघड झाले आहे. आजही या ठिकाणी अशा प्रकारे बेकायदेशीर धंदे सुरू असताना देखील यांच्यावर कारवाई केली जात नाही. कारण येथील राजकीय पक्षांचे नेते, काही लोकप्रतिनिधी यांच्या काम धंदे देखील याच व्यवसाया सोबत निगडित आहेत. कोणी कारखान्यातील भंगार विकत घेते तर कोणी चिंदी कपडा व काही रासायनिक घनकचरा विल्हेवाट लावण्याचे काम अशा प्रकारे तारापुर प्रदुषणकारी करण्यासाठी काही स्थानिक देखील जबाबदार आहेत. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असलेल्या भंगार व केमिकल माफियांच्या धंद्यात कोणीही विरोध किंवा आड आले तर त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांचा वापर देखील केला जात असल्याचे प्रत्यक्षात घेतलेल्या अनुभवातून देखील दिसुन आले आहे. यातच वर्षभरापूर्वी याच अवधनगर येथे रासायनिक घनकचऱ्यांने भरलेल्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला देखील सज्जड दम भंगारमाफियांनी भरला असताना देखील पोलिस प्रशासन काहीही विषेश कारवाई करू शकले नव्हते.
काही दिवसापूर्वी औद्योगिक क्षेत्रातून रासायनिक घनकचरा घेवून निघालेला मालवाहू ट्रक बोईसर पोलिसांनी बेटेगाव चौकीवर अडवला होता. त्यानंतर तो सोडुन देण्यात आला कारण पोलिसांच्या म्हणण्यानुसार या वाहनाकडे कागदपत्रे होती. परंतु ज्या कारखान्यातुन रासायनिक घनकचरा उचलला होता त्या कारखान्यांचे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ज्यावेळी वाहन थांबवले होते त्यावेळी उपलब्ध नव्हती. कागदपत्रे ही त्याच कारखान्यांच्या नावे असलेल्या दुसऱ्या ठिकाणी असलेल्या कारखान्यांची होती हे पोलिसांना देखील माहिती होते. तरी देखील घातक रसायन भरलेला ट्रक पोलिसांनी सोडून दिला. यातच वेस्ट मँनेजमेंट च्या ज्या ट्रक मधुन रासायनिक घनकचरा वाहतूक केला जातो त्याला जीपीएस प्रणाली लावणे बंधनकारक आहे. मग ट्रक नेमका कुठून निघाला याबाबत पोलिसांनी जीपीएस नुसार माहिती का घेतली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. यामुळे नवीन आलेले पोलीस अधिक्षक तारापुरच्या केमिकल मध्ये लक्ष देणार का याची वाट पाहणे गरजेचे आहे.