पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आखाडा ग्रामपंचायत क्षेत्रातील बहुतांशी पाड्यांमध्ये तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली असुन येथील ग्रामस्था प्रमाणे प्राण्यांनाही पाणी पिण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे.
वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून आखाडा परिसर ओळखला जातो. या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अनेक पाड्यांमध्ये जायला रस्ता नाही, काही पाड्यांमध्ये विज नाही. पिंजाळी नदीच्या लगत हा गाव असून पिंजाळी नदीचे पात्र पुर्णपणे अटून गेल्याने येथील गुरे, शेळ्या पाणी पिण्यासाठी नदीपात्रातील दगडांमध्ये पाण्याचा शोध घेण्यासाठी वणवण भटकताना दिसुन येत आहेत. आखाडा ग्रामपंचायत मधील भगतपाडा येथील महिलांना दोन किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडे ठेवून पाणी भरावे लागत आहे.अतिदुर्गम भाग असल्याने रस्त्यांअभावी पाण्याच्या श्रोताजवळ जाण्यासाठी बैलगाडीचाही उपयोग होत नाही.
मुंबई महानगरपालिकेचा प्रस्तावित असलेला पिंजाळ प्रकल्प याच परिसरात होत असुन आखाडा हे गांव बुडीत क्षेत्रात येत असल्याने या परिसरातील अनेक विकास कामांकडे शासनाने दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. येथे होणा-या प्रस्तावित पिंजाळ प्रकल्पाचा फटका आतापासूनच येथील आदिवासी बांधवांना बसु लागला आहे. नदीपलिकडे असलेल्या आखाडा गावाणचा पावसाळ्यातील चार महिने संपर्क तालुक्याशी तुटत असतो. दिड हजाराहून अधिक लोकवस्ती आखाडा ग्रामपंचायत क्षेत्रात असु ती शंभर टक्के आदिवासी समाजाची आहे.