पालघर दर्पण: रमेश पाटील
वाडा: कल्हई लावा कल्हई.. ही गल्ली बोळात पूर्वी नेहेमी ऐकू येणारी चिरपरीचित हाक काळाच्या ओघात मागील पंधरा, वीस वर्षात बंदच झालेली दिसुन येत आहे. एकेकाळी जुन्याचे सोनं करणारा हा व्यवसायच काळाच्या पडद्याआड गेला आहे.
तांब्या, पितळी भांड्यातील अन्न नासु नये यासाठी या भांड्याना आतून कल्हई लावली जायची. पण हळुहळू माणूस आधुनिकतेकडे वळला, घरातील तांब्या पितळेची भांडी संसारातूनच हद्दपार झाली. आणि त्या जागेवर स्टील, अल्युमिनियमची भांडी आली. त्यामुळे कल्हई लावण्याचा व्यवसायही हद्दपार झाला. तांबे, पितळी भांड्यांना आतून कल्हई लावण्यासाठी कल्हईवाले गावोगावी फिरून आपला व्यवसाय करायचे. गावातील सावली देणा-या एखाद्या झाडाखाली कल्हई लावणारा बसायचा. तो कोळश्याच्या निखाऱ्यावर भांडे गरम करुन नवसागराची पूड टाकून स्वच्छ करुन लगेचच कथलाची कांडी फिरवायचा. ही कांडी जादुई करामत करुन तांबे, पितळेचे भांडे आतून चांदीसारखे चमकायचे. त्यामुळे कल्हईवाला जीवनाचा अविभाज्य घटक असल्याने सदैव त्याचे सर्वत्र स्वागत व्हायचे.
विस वर्षांपूर्वी गरीब असो वा श्रीमंत, झोपडीतला असो वा बंगलेवाला सगळ्यांकडेच तांबे, पितळीची भांडी असायचीच. कल्हई करणारा आपल्या कौशल्याने गरम चटके वाचवत लोकांना रुपेरी भांडी वापरायचा अनुभव अगदी नाममात्र पैशात देत असे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर अनेकांनी तांब्या, पितलेच्या भांड्यातून शिजविलेल्या स्वैपाकाला प्राधान्य दिले आहे, अनेकजण तांब्या, पितळेच्या भांड्यातील पाणी पित आहेत. जगाला कल्हईच्या भांड्यातील पदार्थाचे शास्त्रीय महत्त्व पटत आहे. लवकरच पुन्हा कल्हई लावा कल्हई.. ही कल्हईवाल्याची हाक नक्की ऐकू येणार असे वाटत आहे.