◾ उटावली-म्हसकर पाडयात टँकरची मागणी
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: सुमारे 1 लाख 14 हजार लोकसंख्या असलेल्या विक्रमगड तालुक्याची पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करीत आहे. तालुक्यात दरवर्शी 34 ते 35 गावपाडयांना पाणीटंचाईची झळ बसत असते व टँकरने पाणीपुरठा करावा लागतो. फेब्रुवारी पासुनच येथे पाणी टंचाई सुरु होते ती एप्रिल मे मध्ये पराकोटीला जावुन पोहचते व जोपर्यत चांगला पाऊस होत नाही तोपर्यत पाणी टंचाईचा सामना हा करावाच लागतो. नदी नाले विहीरी आटल्या आहेत. विक्रमगड तालुक्यातील उटावली ग्रामपंचायतीपैकी असलेला म्हसकरपाडयात सध्या मोठया प्रमाणावर पाणीटंचाई सुरु झाली आहे.
विक्रमगड तालुक्यातील उटावली ग्रामपंचायत अंतर्गत म्हसेपाडा व परिसरातील पाण्याचे जलस्त्रोत पूर्ण आटले असुन त्या ठिकाणी लोकांना 4 किमी पायपिट करुन पाण्यासाठी नदीचा आसरा घ्यावा लागत आहे. येथील महिलांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हांत वणवण भटकंती करावी लागत आहे. विक्रमगड तालुक्याच्या या भागत तर दरवर्षी पाणी टंचाईची झळ बसत असतानाही प्रशासन मात्र कोणत्याही प्रकारची हालचल करताना दिसत नाही. त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी पहाटे उठुनच घरातील पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागते. मग पाणी आणण्याचा लांबचा पल्ला असो तरीही ही पाण्याची सोय करावीच लागते. मात्र यामध्ये महिलांनाच त्रास सहन करावा लागत असल्याची खंत येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम महाले यांनी व्यक्त केली.
दरम्यानच्या काळात प्रशासनाने जानेवारी महिन्यापासुनच संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याकरीता पाणी टंचाई आराखडा तयार करुन पाणी टंचाई निर्माणच होणार नाही. याकरीता गंभीर पावले उचलावयास हवी होती. जेणे करुन टंचाईग्रस्त भागाचा वाढत जाणार भार कमी होईल. फेब्रुवारी महिन्यातच आटत चालेल्या विहीरींमध्ये टँकरने पाणी टाकायला सुरवात करायला हवी होती . मात्र प्रशासन जोपर्यत पाणी टंचाई पराकोटीला जात नाही. तोपर्यत हालचाली करीत नाही,असा आरोपही प्रशासनावर येथील ग्रामस्थांनी केेला आहे.
तालुक्यात उटावली या ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या म्हसकरपाडयात पाणीपुरवठा विभागान टँकरने पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. परंतु प्रशासनाकडून अजुन काहीच हालचाली नसल्याचे येथील ग्रामस्थ महिलांनी सांगीतले. या भागात व संपुर्ण तालुक्यात पाणीपुवठा विभाग व त्यासंबंधीत अधिकारी वर्गाने सर्वेक्षण करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. व याबाबत ठोस भुमीका बजावुन टँकरला मंजुरी घेवुन पाणी पुरवठा करावा व या येथील महिलांना होणार त्रास दुर करावा अशी मागणी होत आहे.