पालघर दर्पण प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्याची निर्मिती होऊन सहा वर्षे उलटुन देखील पालघर हा रिक्त पदाचा जिल्हा म्हणून ओळखला जावु लागला आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर देखील पालघर वासीयांचे दुखणे कायमच असुन जिल्ह्यातील पोलिस, महसूल, जिल्हा परिषद अशा विविध प्रशासकीय विभागांमध्ये ७५% जागा रिक्त आहेत. त्यामुळे या जागा तातडीने भरण्यात याव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांन कडे राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी मागणी केली आहे.
पालघर आदिवासी बहुल जिल्हा असुन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. यातच मस्तावलेले अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात ठाण्याहून आयात झाल्याने अनेक विभागात अधिकारीच उपलब्ध नसतात. एकतर २५ टक्के कर्मचाऱ्यांनवर जिल्ह्यातील कामाचा गाडा हाकला जात असुन काही कामचुकार कर्मचाऱ्यांन मुळे आदिवासी नागरीकांना आपली कामे करताना फरफट होते. यातच जिल्ह्यात विविध नवीन प्रकल्प आल्याने जिल्ह्यावर प्रचंड ताण पडत असल्याने जिल्ह्याच्या विकासावर या सर्वांचा परिणाम होऊन जिल्हा निर्मितीचा उद्देशच साध्य झालेला नाही. यामुळे मनमानी पध्दतीने गैरहजर राहणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या तातडीने कारवाई व्हावी तसेच रिक्त असलेली ७५ टक्के पदे भरण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी केली आहे.