◾ हेमेंद्र पाटील
पर्यावरणाचे रक्षण व संरक्षण यासाठी जागतिक पर्यावरण दिन जगभर साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांनी 1972 मध्ये जागतिक पातळीवर पर्यावरणाकडे राजकीय आणि सामाजिक प्रबोधन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 5 जून 1974 रोजी पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला या दिवसाला आता 47 वर्ष उलटून गेली आहेत. तारापुरात औद्योगिक क्षेत्र उभारणी करू देखील तेवढीच वर्ष उलटली असुन यावर्षी देखील फोटो काढण्यासाठी पर्यावरण दिन सर्वच स्थरातुन साजरा केला जाईल यामध्ये काही नवल नाही.
आशिया खंडातील सर्वात मोठी असलेल्या तारापुर औद्योगिक क्षेत्रात वाढलेले प्रदुषण यामुळे केंद्राकडून सर्वात प्रदुषित औद्योगिक वसाहत असे नामांकन मिळाले. याचा गौरव वाटला की, काय म्हणून येथील प्रदुषणाकडे राज्य सरकारने देखील दुर्लक्ष केले आहे. औद्योगिक परिसरा भोवती असलेल्या शेतजमीनी नापीक झाल्या, नैसर्गिक नाले पुर्णपणे दुषित झाले. यातच समुद्र देखील मोठ्या प्रमाणात प्रदुषित रोजच होत असताना देखील शासनाला हजारो कोटीचे उत्पादन मिळते म्हणजे प्रदुषणाकडे केले जाणारे दुर्लक्ष येणाऱ्या काळात अडचणीचे ठरणार आहे. तारापुर मधील रासायनिक कारखान्यातुन निघणारे घातक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच चोरट्या पद्धतीने नाल्यात सोडुन दिले जाते. याबाबत तक्रार केल्यानंतर देखील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून अनेकदा दुर्लक्ष केले जाते. काही कारखान्यावर कारवाई केल्याचा भास दाखवत कारवाई केली जाते. मात्र ज्या कारणांमुळे कारखाना बंद केला त्याची पुर्तता केली नसताना देखील फक्त बँकेच्या हमी पत्रावर प्रदुषकारी कारखाने पुन्हा सुरू केले जातात.
तारापुर देशात सर्वांत अधिक प्रदुषकारी असल्याने याठिकाणी काही तरी सुधारणा होईल असे येथील नागरीकांना वाटतं होत. परंतु राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष करत संबंधित पर्यावरण खात्यांचे मंत्र्यांनी एकदाही तारापुरात येवून प्रदुषणाची पाहणी केली नाही. किंबहूना त्यांना येथे प्रदुषित हवा पेलवणार नाही कारण 97 टक्के प्रदुषित असलेल्या भागात मानव राहु शकतो तरी कसा हा मोठा प्रश्न आहे. रोजच विषारी हवा घेवुन येथील नागरीकांना अनेक आजारांना समोरे जावे लागते. परंतु याबाबत कितीही ओरडा केला तरी येणाऱ्या अनेक सत्ताधारी पक्षांन कडुन कधीही अशा प्रदुषणकारी कारखान्यांवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न केले जात नाही. येथील प्रदुषणावर नियंत्रण यावे यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने देखील विषेश असे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केलेले नसल्याने दिवसेंदिवस प्रदुषणाचा स्थर वाढत चालला आहे. रात्रीच्या वेळी विषारी सोडला जाणारा वायू व नाल्यात सोडले जाणारे रसायन यामुळे याठिकाणी राहणाऱ्या नागरीकांच्या आरोग्या धोक्यात आले आहे.
पर्यावरणाचा विनाश तारापुर मध्ये होत असताना देखील कमकुवत असलेला कायदा यामुळे शेकडो कारखानदार आजवर मोकाट फिरत असुन वर्षानुवर्षे प्रदुषण करताना दिसतात. याभागात वातावरणातील होणारे बदल यामुळे धोक्यात आलेले पर्यावरण हे आता एक दिवशी पर्यावरण दिन साजरा करून प्रदुषण कमी करण्याचा शासन एकदिवसीय कार्यक्रम घेवुन मोकळे होईल मात्र तारापुराची धोक्याची घंटा राज्य सरकारने वेळीच ओळखली तर नक्कीच निसर्गाचा समतोल राखला जाईल.