- रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून काढलेला गाळ पावसाळ्यात वाहुन जाण्याच्या स्थितीत; काही भागात ताडपत्री न टाकताच खड्डा खोदुन टाकण्यात आला रासायनिक गाळ
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या सामुहिक प्रकल्पात साचलेला गाळ काढण्यात आला आहे. टाळेबंदीत कारखाने बंद असल्याने यावेळी हा गाळ काढण्यात आला मात्र मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे हा गाळ पाठविण्यात आला नसल्याने पावसाळ्यात गाळ वाहुन जाण्याच्या स्थितीत आहे. यातच काही भागात खड्डा खोदुन गाळ टाकला असल्याचे देखील समोर आले आहे. येथील अनागोंदी कारभाराकडे प्रशासनाने देखील दुर्लक्ष केले असल्याने घातक रसायन मिश्रित गाळ आता वाहुन जाण्याच्या स्थितीत आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर तसेच अतिरिक्त येणारे सांडपाणी एमआयडीसीच्या ए एम 29 या प्लॉटमध्ये असलेल्या सुमारे 38 दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी गोळा करणाऱ्या ठिकाणा मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. गेल्या वीस पंचवीस वर्षात साचलेला गाळ प्रभावीपणे काढण्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अपयशी ठरले होते परिणामी या संप मधून पाणी नाल्यांमध्ये वाहून जाताना त्यासोबत गाळ वाहून जात असल्याने शेती मत्स्यव्यवसायाला अपायकारक ठरते. राष्ट्रीय हरित लवादाने एका प्रकरणात निकाल देताना तारापुर मधील प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी केंद्रीय समिती गठीत केली होती या समितीच्या निर्देशानुसार तसेच करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या टाळेबंदी चा लाभ घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली तारापूर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन सोसायटी सुमारे चार ते साडेचार हजार टन ओला गाळ या ठिकाणाहून काढला.
सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र भागात असलेल्या मोकळ्या जागेत काही ठिकाणी ताडपत्री आच्छादन करून त्यावर हा काळ सुकवण्यात आला तर काही भागात खड्डा खोदून हा गाळ तसाच टाकण्यात आला. याकडे मात्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. या गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असलेल्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीकडे सुमारे तीन हजार 650 टन गाळ तळोजा येथील विल्हेवाट केंद्रात पाठविण्यात आला.
दरम्यान आलेल्या चक्रीवादळामुळे पावसाला लवकर आरंभ झाला तसेच मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीने घातक घनकचरा विल्हेवाट केंद्र नियोजित वेळेच्या सुमारे पंधरा दिवस अगोदर बंद केल्याने तारापूर येथील सुमारे बाराशे टन गाळ सध्या उघड्यावर राहिला असुन त्यामुळे पावसाचे पाणी मिसळत असल्याने चिंतेची बाब झाली आहे. संपूर्ण पावसाळ्याच्या काळात या गाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच त्याला पावसाचे पाण्याचे संपर्क येऊ नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे असुन याकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या प्रमाणात प्रदुषण याभागात होण्याची शक्यता आहे.