विधानपरिषदेवर कुणबी नेतृत्वाला संधी देण्याची मागणी; समाजाकडून महाविकास आघाडी कडे मोर्चेबांधणी
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
पालघर: कोकणात कुणबी समाज बहुसंख्य असला तरी या समाजाला कोणत्याही राजकीय पक्षाने हव तस नेतृत्व मिळालेल नाही. राजकीय दृष्ट्या सर्वच पक्षांनी या समाजाला डावळलं असल्याने हा समाज अजूनही उपेक्षित राहिला आहे. यामुळे आता विधानपरिषदेच्या एका जागेवर कुणबी समाजला स्थान मिळाव यासाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. समाजाकडून याबाबत महाविकास आघाडी कडे मागणी केली जात आहे.
ठाणे तसेच पालघर जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या कुणबी समाजाला आरक्षणामुळे 1977 सालापासून असलेल्या राजकीय आरक्षणामुळे विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळू शकली नाही. यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात असून आता नव्याने आरक्षणाची मुदत आणखी 10 वर्षांनी वाढविण्यात आली असल्याने समाजातील युवकांचे राजकीय स्वप्न भंग झाले आहे. यातच समाजातील मोठ्या प्रमाणात तरुण उच्च शिक्षित असून देखील बेरोजगार आहेत. लोकसंखेच्या दृष्टीने पालघर मध्ये हा समाज मोठ्या प्रमाणात असला तरी येथील आरक्षणामुळे कुणबी समाज राजकीय दृष्ट्या वंचित राहिला आहे .
महाराष्ट्र विधानसभेच्या सध्या रिक्त झालेल्या विधानपरिषेदेच्या 12 जागांपैकी एक जागा ही कुणबी समाजातील व्यक्ती ला द्यावी अशी मागणी महा विकास आघाडी कडे या समाजाकडून करण्यात आली आहे. पालघर मधील नानिवली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यावेळी कुणबी समाजातील विविध मंडळांकडून महा विकास आघाडीच्या पक्ष श्रेष्ठीना पत्र देऊन मिलिंद पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. यावेळी बैठकीला समाजाचे जेष्ठ नेते सुरेंद्र पाटील, संतोष पावडे, युवक मंडळाचे अध्यक्ष दिपेश पावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.