◾ आदिवासी वाड्यांवर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यात करावा लागतो जीवघेणा प्रवास
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: तालुक्यात भोपोली आणि घाणेकर या गावांची गृप ग्रामपंचायत असून १९००-२००० लोकसंख्या असणाऱ्या घाणेघर गावातुन भोपोली गावात जाण्या-येण्यासाठी असलेल्या ओहळावर पूल नसल्याने ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना लाकडाच्या बनविण्यात येणारया साकावावरून पावसाळ्यात धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
घाणेकर गावातील ग्रामस्थांना भोपोली येथील ग्रामपंचायत कार्यालयीन कामासाठी आणि इतर कामांसाठी भोपोली गावात जाताना त्यांना बोरांडे किंवा तलावली या गावातून ५ ते ६ किलोमीटर जास्तीचे अंतर कापत फेरफटका मारून भोपोली गावात जावे लागत आहे. गावातील विद्यार्थ्यांना देखील शाळेत ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच घाणेकर गावातील १ ली ते १२ वी चे एकूण १५० विद्यार्थी आश्रमशाळेत व हायस्कूलमधील विद्यार्थी भोपोली गावात शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे दोन्ही गावाच्या मधून वाहणाऱ्या ओढ्यावर पूल(सकाव) बांधल्यास नागरिकांचे होणारे हाल कमी होतील.
दरम्यान घाणेघर ग्रामस्थांनी व पालकवर्गांने श्रमदान करून सदर ओहळात लाकडी साकाव तयार केले आहे. असे असले तरी पावसाळ्यात या लाकडी साकावावरुन तारेवरची कसरत करतचजीवघेणा प्रवास करावा लागणार आहे. ग्रामस्थांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच यांच्याकडे साकाव बांधणीसाठी वारंवार मागणी करून देखील हा प्रश्न सुटलेला नाही. ग्रामस्थांनी याबाबत अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभाग विक्रमगड व जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे देखील विचारणा केली मात्र अद्याप प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष घातलेले नाही. वारंवार विचारणा केली असता रोहयो अंतर्गत काम मंजूर झाले असल्याचे व लवकरच काम सुरु होईल असे उत्तर ग्रामस्थांना देण्यात आले मात्र अद्याप साकावचे काम झालेले नाही.
◾ पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. गतवर्षी या ओढ्याला आलेल्या पुरात एक शाळकरी मुलगी वाहून गेली होती मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली होती. त्यामुळे किमान या वर्षी तरी साकावचे काम केले जावे ही अपेक्षा आहे.
महेंद्र पाटील
सामाजिक कार्यकर्ते – भोपोल