◾ घातक रसायन निघाले कागदोपत्री गुजरातसाठी पण रसायन खाली केेेले वेंगणी गावात; तारापुर पोलिसांनी रसायन आणणारा ट्रक दिला सोडुन
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक घनकचरा व घातक रसायन विल्हेवाट लावण्यासाठी बेकायदेशीर वाहतूकीचे प्रकार सुरूच आहेत. असाच प्रकार पुन्हा घडला असुन औद्योगिक क्षेत्रातुन आणण्यात आलेले घातक रसायन वेंगणी गावात साठवून ठेवल्याचा प्रकार घडला आहे. येथील गावकऱ्यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर तारापुर पोलिस याठिकाणी गेले मात्र त्यांनी घातक रसायन घेवुन आलेला ट्रक सोडुन दिल्याने हा प्रकार मिटविण्यासाठी तर पोलिस प्रयत्न करत नव्हते ना असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत.
तारापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेंगणी गावात अतिक्रमण केलेल्या जागेवर एका वाडीत घातक रसायनाचा साठा करत असल्याचे गावकऱ्यांनी उघडकीस आणून दिले. वेंगणी याठिकाणी आलेले वाहन क्रमांक एमएच 04 एच 7745 हे वाहन गुजरात मध्ये जाण्यासाठी जिएसटी बिल बनवुन बोईसर मधील एका खाजगी कार्यालयाच्या पत्यावरून निघाल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र हे घातक रसायन घेवुन निघालेले वाहन शनिवार 20 जुन रोजी सकाळी गुजरात कडे न जाता थेट वेंगणी गावात पोचले. याठिकाणी असलेल्या एका वाडीत हा साठा केला जात होता. गावकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर तारापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव व त्यांचे सहकारी पोचले त्यांनी याबाबत चौकशी केली. मात्र केमिकल घेवुन आलेला ट्रक सोडुन देण्यात आला यामुळे वेंगणी येथील केमिकल लोचा नेमकी काय याबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत.
तारापुर पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर त्याठिकाणी हा ट्रक उभा होता. तसेच पोलिस हा ट्रक घेवुन पोलीस ठाण्यात देखील आले होते. परंतु अचानक ट्रक गायब झाल्याने या घटनेचे गुढ अधिकच वाढत चालले आहे. तारापुर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कागदपत्रे व वाहन चालकाला ताब्यात का घेतले नाही. यातच बेकायदेशीर पणे रसायन साठवणूक केल्याचे व त्याकडे असलेली कागदपत्रे ही इतर ठिकाणी जाणारी असताना पोलिसांनी केमिकल माफियाला दिलेले मोकळीक चिंताजनक आहे. तारापुर पोलीस ठाणे हद्दीत पाचमार्ग नाका येथे तपासणी नाका असताना याठिकाणी गावात जाणारे वाहन पोलिसांना कसे दिसले नाही की, पोलिसांनी आपली नजर दुसरी कडे फिरवली हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान तारापुर पोलिसांनी रसायन बाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला कळवले असुन याबाबत चौकशी अंती हे रसायन कोणत्या कारखान्यातुन आणले याबाबत चे काय सत्य समोर येते हे पाहावे लागणार आहे.
◾ सुट्टी असल्याने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तपासणी साठी येवु शकले नाही. त्याचा तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. ट्रक चालकाने घेवून गेलेला ट्रक पुन्हा मागविण्यात आला आहे.
— संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तारापुर