◾ टाळेबंदी आणि निसर्गाच्या लहरीपणाचा मुळे बहाडोलीचे जांभूळ उत्पादक शेतकरी अडचणीत; बहाडोली परिसरातील जांभूळ उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात
पालघर दर्पण: नावेद शेख
मनोर: निसर्गाच्या लहरीपणामुळे पालघर तालुक्यातील बहाडोली गावच्या जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली आहे.जांभूळ काढणीच्या हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मागणी अभावी जांभळाला अपेक्षित दर मिळत नाही. खते,कीटकनाशक फवारणी,जांभूळ तोंडणीसाठी लागणारे मनुष्यबळ आणि वाहतूकीसाठी लागणाऱ्या खर्चाचा ताळमेळ बसत नाही. कोरोनामुळे रोजगारात घट झाली असताना जांभळापासून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाल्याने जांभूळ उत्पादक शेतकरी शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पालघर तालुक्यातील बहाडोली गाव जांभळासाठी प्रसिद्ध असल्याने बहाडोलीच्या जांभळाना बाजारपेठेत मोठी मागणी असते.डिसेंबर महिन्यात जांभळाच्या झाडाला मोहोर आल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जांभळे काढणीसाठी तयार होतात.आणि जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दीड महिना जांभळाचा फळांचा हंगाम सुरू राहतो.चांगल्या दर्जाच्या जांभळाला बाजारात सरासरी 300 ते 400 रुपये किलो प्रमाणे भाव मिळतो. जांभळाच्या झाडामुळे शेतकऱ्यांना वार्षिक 25 ते 30 हजारांचे उत्पन्न मिळते.
गेल्या वर्षी मान्सून लांबल्याने जांभळाच्या झाडांना महिनाभराच्या उशिराने मोहोर आला होता. त्यामुळे यंदाचा जांभळाचा हंगामाला एक महिना उशिराने सुरुवात झाली.जांभळाच्या झाडांना डिसेंबर महिन्यात येणारा मोहोर यंदा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आला होता.त्यामुळे जांभळाच्या झाडाचे निसर्गचक्र बदलल्याने यंदा जांभळाच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे.या परिस्थितीत मे महिन्यात निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर सुटलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे तयार जांभळे खडून पडली आणि झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या.
यावेळी झालेल्या पावसामुळे जांभळाच्या फळांवर माश्यांमुळे होणारा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने कराव्या लागणाऱ्या फवारणीचा खर्च वाढला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पडली होती.
मुंबई शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक ठिकाणे प्रतिबंधीत करण्यात आली आहेत.मुंबईतून जांभळाच्या मागणीत घट झाली असल्याने बाजारात जांभळाला अपेक्षित दर मिळत नाही.उत्पादनात निम्म्याने झालेली घट आणि पडलेला दर यामुळे जांभूळ उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला असून उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
■ बहाडोली परिसरातील जांभळाच्या फळाचा दर्जा चांगला आहे. यंदा जांभळाचा हंगाम लांबल्याने फळ तोडणीला उशीर झाला आहे.त्यामुळे जांभळाचा दर प्रतिकिलो 60-70 रुपयांपर्यंत आला होता.लांबलेला पाऊस जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडला असून जांभळाच्या विक्री दरात वाढ होत आहे. जांभळाच्या झाडापासून चांगले उत्पन्न मिळत असल्याने बहाडोली, खामलोली, दहिसर, साखरे परिसरातील शेतकऱ्यांनी जांभळाच्या झाडांची लागवड करावी.
— तरुण वैती,
तालुका कृषी अधिकारी, पालघर.
■ वातावरणातील बदलामुळे यंदा जांभळाचे उत्पादन घटले आहे. अशातच जांभळाचे दर पडल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे.कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना जांभूळ शेतीचे नियोजना बाबत मार्गदर्शन केले पाहिजे. जांभळाला स्थानिक तसेच राष्ट्रीत स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे.
— अनिल पाटील,
जांभूळ उत्पादक शेतकरी, बहाडोली.
◾ बहाडोली परिसरात उच्च प्रतीच्या जांभळाची सुमारे पाच हजार झाडे आहेत.जांभळाच्या झाडापासून एका हंगामात शेतकऱ्याला सुमारे 25 ते 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.मागणी घटल्याने उत्पन्न वाढीसाठी जांभळापासून ज्यूस आणि बि पासून पावडर तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.मधुमेहावर गुणकारी असल्याने जांभळाचा ज्यूस आणि पावडरला मोठी मागणी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.