- गतवर्षीच्या महापुरात वाहून गेलेल्या रस्त्यांची वर्षभरात दुरुस्तीच नाही; पावसाळ्यात अनेक रस्त्यावरील वाहतूक होणार बंद
पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाडा तालुक्यातील अनेक रस्त्यांची मोठी हाणी झाली होती. काही रस्त्यांवरील मो-या वाहुन गेल्या होत्या, पुरहाणीत झालेल्या या दुरावस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभर ढुंकूनही न बघितल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यावरील वाहतूक या पावसाळ्यात ठप्प होणार आहे, तर काही ठिकाणी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीत मांडवा – गारगांव दरम्यान असलेल्या तीन मो-या नादुरुस्त झालेल्या आहेत. पिंजाळ – दाभोण हा रस्ता पुर्ण उखडला गेला आहे. कळंभे – निशेत दरम्यान रस्ता खचलेला आहे. नांदणी – निंबवली या रस्त्या दरम्यान असलेल्या दोन्ही मो-यांवर मोठ मोठे भगदाडे पडली आहेत. अशा अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली असतानाही वर्षभरात सार्वजनिक बांधकाम उप विभागीय कार्यालयातील एकाही अधिका-यांनी अथवा शाखा अभियंता यांनी या नादुरुस्त झालेल्या रस्त्यांकडे गेल्या वर्षभरात ढुंकूनही बघितलेले नाही.
आपत्कालीन व्यवस्था म्हणुन शासन अशा कामांसाठी करोडो रुपयांचा निधीचा पुरवठा करीत असते. मात्र येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुरुस्तींच्या कामांकडे अक्षम दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवलेली असल्याचे कुणबी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष परशुराम सावंत यांनी सांगितले. गेल्या वर्षी महापुरात वाडा – मलवाडा या रस्त्यावरील पास्ते गावानजीक दोन मो-यांचा बराचसा भाग वाहुन गेलेला आहे. या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या मो-यांची वेळीच दुरुस्ती केली नाही तर या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देसई – कळंभे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अनेक अपघात होत असतानाही येथील दुरुस्तीच्या कामांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.
नांदणी – निंबवली या रस्त्यावरील मो-यांची वेळीच दुरुस्ती केली नाही तर या मार्गावरील वाहतूक ठप्प होणार आहे. विशेष म्हणजे नांदणी येथील दोन्ही मो-यांची कामे दोन वर्षापुर्वीच नव्याने केली असताना निकृष्ट कामामुळे या मो-यांवर भगदाडे पडल्याचा आरोप येथील भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष कृष्णा भोईर यांनी केला आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी या तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांच्या निविदा काढण्यात येतात, मात्र प्रत्यक्षात कुठेच दुरुस्तीचे काम झालेले दिसुन येत नाही, असा आरोपही कुणबी सेनेचे परशुराम सावंत यांनी केला आहे.
◾ गेल्या वर्षभरात वाडा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाला पुर्ण वेळ उपअभियंता म्हणून अधिकारीच नसल्याने ही परिस्थिती उद्भवलेली असल्याचे बोलले जात आहे. आजही वाडा येथील उप अभियंताचा पदभार मोखाडा येथील उप अंभियंताकडे देण्यात आलेला आहे.
◾ गतवर्षीच्या महापुरात नादुरुस्त झालेल्या रस्त्यांबाबत वारंवार लेखी तक्रारी करुनही सार्वजनिक बांधकाम विभागाने तक्रारींकडे दुर्लक्ष केले आहे.
— राजेश रिकामे, उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, वाडा तालुका.
◾ विशेष दुरुस्तीसाठी निधी न आल्यामुळे तालुक्यातील काही रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे झालेली नाहीत.
— दिलीप बाविस्कर, प्रभारी उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा.