वाडा कृषि विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर
पालघर दर्पण: रमेश पाटील
वाडा: उपविभागीय कृषी कार्यालय वाडा अंतर्गत येत असलेल्या वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा या चार तालुक्यांसाठी शासनाकडून जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी सन 2019 -20 मध्ये एक कोटी 31 लाख 67 हजार रुपये दिले होते. मात्र यामधील 39 लाख 91 हजार रुपये खर्च न करता ही रक्कम समर्पित केली आहे. ही रक्कम परत गेली नसुन ती परत मिळेल असे येथील उपविभागीय कृषी अधिकारी प्रविण गवांदे यांचे म्हणणे आहे.
वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या चारही तालुक्यांतील 70 ते 80 टक्के भाग हा आदिवासी व ग्रामीण आहे. येथील नागरिक शेती या एकमेव व्यवसायावर अवलंबून आहेत. येथील कोरडवाहू शेती अधिकाधिक ओलिताखाली येण्यासाठी शासन जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सिमेंट बंधारे, माती बंधारे, मजगी यावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत आहे. मात्र आजवर या चारही तालुक्यांतील दोन टक्केही जमीनीचे क्षेत्र ओलिताखाली आलेले नाही.
जलयुक्त शिवार योजनेची कामे निविदा प्रसिद्ध करुन ती ठेकेदारांकडून होऊ लागल्यापासुन या कामांना मोठा ब्रेक लागला आहे. काही वर्षांपुर्वी जलसंधारण योजनेची वाडा उपविभागात कृषी खात्यांतर्गत दरवर्षी 10 ते 12 कोटींहून अधिक रकमेची कामे होत होती. मात्र निविदा पद्धत सुरू झाल्यापासून कृषि विभागातील काही अधिका-यांनी विविध प्रकारच्या अडचणी दाखविण्यास सुरुवात केली. व या कामांसाठी येणारा निधी समर्पित करण्याचा सपाटाच लावला आहे.
सन 2019 -20 या गतवर्षासाठी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करण्यासाठी वाडा उपविभागाला अवघा एक कोटी 31 लाख 67 हजार रुपयांचा निधी मिळाला होता. वर्षभरात वाडा विभागाने फक्त 91 लाख 76 हजार रुपयेच खर्च केले आहेत. उर्वरित 39 लाख 91 हजार रुपयांचा निधी समर्पित केला असल्याचे सांगितले जात आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय जव्हार यांनी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत वर्षभरात एकही काम केलेले नाही, तर मोखाडा तालुक्यासाठी देण्यात आलेला 65 लाख 90 हजार रुपयांच्या निधीपैकी 29 लाख 25 हजार रुपयांचा निधी समर्पित करण्यात आला आहे.
सन 2019 -20 या अर्थीक वर्षांचा निधी त्याच वर्षी खर्च होणे अपेक्षित असताना वेळीच कामाचे नियोजन न करणे, अंदाजपत्रके वेळेवर न पाठविणे, निविदा मुदतीत न काढणे अशा कारणांमुळे हा निधी समर्पित झाल्याचे बोलले जात आहे.
◾ मार्च अखेरीस आलेल्या करोनाच्या संकटामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या काही कामांना सुरुवात करता न आल्याने हा निधी समर्पित करावा लागला.
— प्रविण गवांदे, उपविभागीय कृषी अधिकारी वाडा, जि. पालघर.