◾ पुलाअभावी विक्रमगड तालुक्यातील घाणेकर ग्रामस्थांचे हाल मथळ्याखाली पालघर दर्पण मध्ये प्रसिद्ध झाली होती बातमी
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: विक्रमगड तालुक्यात भोपोली आणि घाणेकर या गावांची गृप ग्रामपंचायत असून १९००-२००० लोकसंख्या असणाऱ्या घाणेघर गावातुन भोपोली गावात जाण्या-येण्यासाठी असलेल्या ओहळावर पूल नसल्याने ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना लाकडाच्या बनविण्यात येणारया साकावावरून पावसाळ्यात धोकादायक प्रवास करावा लागत आहे. याबाबत पालघर दर्पणच्या मागच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून गावातील समस्या मांडण्यात आला होत्या. त्यांनतर पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी प्रत्यक्ष जागेवर जात या जागेची व पुलाची पाहणी करत गावातील इतरही समस्या जाणून घेतल्या.
घाणेकर गावातील ग्रामस्थांना भोपोली येथील ग्रामपंचायत कार्यालयीन कामासाठी आणि इतर कामांसाठी भोपोली गावात जाताना त्यांना बोरांडे किंवा तलावली या गावातून ५ ते ६ किलोमीटर जास्तीचे अंतर कापत फेरफटका मारून भोपोली गावात जावे लागत आहे. गावातील विद्यार्थ्यांना देखील शाळेत ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच घाणेकर गावातील १ ली ते १२ वी चे एकूण १५० विद्यार्थी आश्रमशाळेत व हायस्कूलमधील विद्यार्थी भोपोली गावात शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे दोन्ही गावाच्या मधून वाहणाऱ्या ओढ्यावर पूल(सकाव) हा त्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांची मागणी मांडण्यात आली होती.त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांनी सदर जागेवर जात रस्ता आणि पुलाची पाहिणी केली. पावसाळा तोंडावर तोंडावर आल्याने खूपच कमी वेळ असल्याने या वर्षी तत्काळ हा पूल होऊ शकणार नाही मात्र हा विषय तत्काळ मांडून पूल मंजूर केला जाणार असल्याचे आश्वासन या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षांकडून देण्यात आले. तसेच घाणेकर-भोपोली दरम्यानचा रस्ता हा वन विभागातून जात असल्याने तोही झालेला नाही. जिल्हाधिकारी आणि वनविभागाचे अधिकारी यांच्याशी बोलून या रस्त्याचा प्रश्न देखील लवकरच सोडविला जाईल असेही आश्वासन या वेळी कामडी यांनी दिले. त्याच बरोबर गावात विजेचा असलेला प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आदेश विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच गावात इतरही अनेक समस्या आहेत या समस्या सोडविण्यासाठी हे गाव दत्तक घेण्याचे विचाराधीन असल्याचे पालघर जिल्हा परिषदेच्या अध्याक्षा भारतीकामडी यांनी पालघर दर्पणच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
◾ वृत्तपत्रात आलेल्या बातम्यामधून विक्रमगड तालुक्यातील घाणेकर गावातील लोकांच्या समस्या समजल्यानंतर मान्य गावातील समस्या जाणून घेण्यासाठी जाऊन आलो.या गावात पाणी,वीज,रस्ते या मूलभूत समस्या आहेत.त्या नक्कीच सोडविण्याचा प्रयत्न मी करणार आहे.तसेच हे गाव दत्तक घेण्याचा माझा विचार आहे.
— भारती कामडी, अध्यक्ष जिल्हा परिषद पालघर