◾ वाडा- मनोर रोडवरील सापणे फाटा येथील घटना; तारापुर औद्योगिक क्षेत्रातील टाकावु घातक रसायनाची जंगल असलेल्या निर्जन स्थळी विल्हेवाट सुरू
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापुर औद्योगिक क्षेत्रातुन घातक रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी केली जाणारी वाहतुकीचे प्रकार सुरू असतानाच आता अशा घातक रसायनाची विल्हेवाट लावली गेल्याचा विषय समोर आला आहे. वाडा- मनोर रस्त्यावर असलेल्या वनविभागाच्या जंगल भागात उग्रवास असलेले रसायन सोडले असल्याचे उघड झाले आहे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या भागात सोडलेल्या रसायनामुळे येथील गवत देखील मेले असुन रस्त्यावर चालणाऱ्या व वाहन चालकांना देखील याचा त्रास जाणवत आहे.
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन चोरट्या पध्दतीने रासायनिक घनकचऱ्यांची व रसायनाची वाहतूक केली जात असल्याचे गेल्या महिन्याभरात अनेकदा उघडकीस आले आहे. यातच एका बंद करण्यात आलेल्या रासायनिक कारखान्यातुन कारवाई झाली असताना देखील पुन्हा रसायनाची चोरटी वाहतूक केल्याचे दिसुन आले होते. मात्र याबाबत तक्रारी होऊन देखील प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याने केमिकल माफियांनी याभागात हैदोस घातला आहे. यातच आता ग्रामीण भागातील निर्जन स्थळी रसायनाची रात्रीच्या वेळी विल्हेवाट लावली जात असुन असाच प्रकार वाडा-मनोर रोड वरील सापणे फाटा येथे उघडकीस आला आहे. याठिकाणी शनिवारी रात्रीच्या वेळी घातक रसायन सोडून दिल्याने मोठ्या प्रमाणात लहान झाडांचे नुकसान झाले आहे. रसायन इतके घातक आहे की, दोन दिवस उलटून देखील याभागात रसायनाचा उग्रवास मोठ्या प्रमाणात येत आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पासुन साधारण पणे 15 किलोमीटर लांब असलेल्या वरले व सापणे गावाच्या मध्ये हे रसायन रस्त्याच्या बाजूला निर्जन स्थळी टाकण्यात आले आहे. वाडा- मनोर रस्त्यावर हा भाग असुन येथील जंगल भागाचा फायदा घेवुन केमिकल माफियांनी रात्रीच्या वेळी हे रसायन टाकल्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरा पासुन तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन टाकावु रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी चोरटी वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले होते. मात्र अशा कारखान्यांवर कारवाई बाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने देखील दुर्लक्ष केल्याने येथील केमिकल माफियांच्या माध्यमातून प्रदुषणकारी कारखानदारांनी केमिकल विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच ठेवले आहेत. यामुळे अशा प्रकाराबाबत प्रशासन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरीकांन कडुन केली जात आहे.
◾ तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन निघाणारे घातक टाकावु रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी हे रसायन मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे पाठवणेबंधनकारक असते. मात्र तेथील प्रक्रिया खर्चिक असल्याने हा खर्च वाचविण्यासाठी केमिकल माफियांना या रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी ठेका दिला जातो.
◾ पावसाळ्यात रासायनिक घनकचरा व रसायनाची विल्हेवाट लावण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. रात्रीच्या वेळी रसायनाची विल्हेवाट लावल्यानंतर जोरदार पाऊस पडल्यावर रसायनाची विल्हेवाट लावली हे दिसून येत नाही. परंतु हेच विषारी रसायन नदी नाल्यात वाहून जात असल्याने त्याचा धोका अधिकच वाढला आहे.
◾ मागच्या काही महिन्यापूर्वी पालघर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साखरे डँम भागात औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यांचे रसायन सोडण्यात आले होते. परिणामी या कारखान्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही. फक्त वाहन चालकावर गुन्हा दाखल करून हे प्रकरण सोईस्कर पणे मिटविण्यात आले होते. या महत्त्वाच्या विषयावर जिल्हा प्रशासनाने देखील दुर्लक्ष केल्याचे दिसून आले होते.
◾ पोलीस चौक्यावरून रसायनाची वाहतूक
तारापुर औद्योगिक क्षेत्रातुन केमिकल माफियांनी रसायनाची व रासायनिक घनकचऱ्यांची बेकायदेशीर पणे वाहतूक केली जात असली तरी यावर स्थानिक पोलीस देखील दुर्लक्ष करतात. कारण याअगोदर बनावट कागदपत्रे दाखवुन घातक रासायनिक घनकचऱ्यांची वाहतूक करणाऱ्या माफियांना बोईसर पोलिसांनी सोडुन दिले होते. रात्री उशिरा होणाऱ्या वाहतुकीला बेटेगाव येथील तपासणी नाक्यावर अडवले देखील जात नाही. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.