पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: पालघर तालुक्यातील वारांगडे येथील आदिवासी जागेवर उभारलेल्या अनधिकृत भंगार गोडाऊन वर महसूल विभागाने कारवाई केली आहे. बोईसर – चिल्हार मुख्य रस्त्यालगत असलेल्या वारांगडे येथे एका आदिवासी व्यक्तीच्या जमिनीवर अनधिकृतपणे गोदामे उभारण्यात आली होती. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. अखेर महसूल विभागाने या अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला आहे.
बोईसर-चिल्हार रस्त्यालगत किसन लाशा सोहांग आदिवासी व्यक्तीची साडे पाच एकर जमीन असून ही जागा बेकायदेशीर पणे विक्री करण्यात आली होती. या आदिवासी जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत व भंगार गोदामे उभारण्यात आली होती. आपली जागा परत मिळावी यासाठी किसन सोहांग यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. यानुसार याठिकाणी बांधकाम करण्यात आलेली अनधिकृतपणे गोदामांवर कारवाई करण्यासाठी बोईसर मंडळ अधिकारी यांना तहसीलदार यांच्या कडुन आदेश देण्यात आले होते. यानुसार येथील सर्व भंगार गोदामांवर हातोडा मारण्यात आला असुन बांधकामे जमीनदोस्त करण्यात आला आहेत. यावेळी बोईसर मंडळ अधिकारी मनिष वर्तक, तलाठी हितेश राऊत व संजय चुरी हे उपस्थित होते.