रक्षाबंधनसाठी बांबूपासून पर्यावरणपूरक अशा 50 हजार राख्या बनविण्याचे लक्ष; घरच्या घरी मिळतोय रोजगार
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: कोरोना विषाणू संसर्गामुळे मार्च महिन्याच्या मध्यापासून देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे समाजातील अनेक घटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.उद्योगधंदे,बाजारपेठा,दुकानं आणि रोजगार बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली.अशा परिस्थितीत खचून न जाता पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड या तालुक्यातील प्रामुख्याने आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेल्या जवळपास 9 गावातील 300 महिलांना केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्प या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बांबूपासून हस्तकलेच्या विविध वस्तू बनविण्याचे रीतसर प्रशिक्षण देऊन त्यांनी बनविलेल्या या वस्तुंना विक्रीसाठी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन तसेच सध्या चीन सोबतच्या बिघडत्या संबंधामुळे स्वदेशी वस्तूंची पर्यायी बाजारपेठ निर्माण करून चिनी वस्तूंना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी या ग्रामीण भागातील महिला एकवटल्या आहेत. आगामी रक्षाबंधन सणासाठी बाजारपेठेत विक्रीसाठी येणाऱ्या चायनीज राख्याना टक्कर देण्यासाठी या महिलांनी बांबूपासून पर्यावरणपूरक अशा 50 हजार स्वदेशी राख्या निर्मितिसाठे कंबर कसली आहे. त्यासाठी केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्प या संस्थेच्या माध्यमातून त्यांना साहित्य उपलब्ध करून दिले जाते. कोरोनाच्या लॉकडाऊन काळातही एकमेकींपासून सुरक्षित अंतर ठेऊन मास्कचा वापर करून या महिला दिवस-रात्र झटत आहेत. तसेच आगामी काळात येणाऱ्या गणपती-नवरात्र आणि दिवाळी सणांसाठी लागणारे आकर्षक मखर आणि आकाश कंदील बांबूपासून बनविण्याचा मानस आहे.
केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्पाच्या माध्यमातून विक्रमगड-वाडा-जव्हार या तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात पर्यायावरणपूरक असे विविध सेवाभावी प्रकल्प स्थानिकांच्या सहकार्याने राबविले जात आहेत. यामध्ये महिला सक्षमीकरण,वृक्ष लागवड,सेंद्रिय शेती इत्यादी ध्येय समोर ठेवून ‘प्रोजेक्ट ग्रीन गोल्डची’ सुरवात केली आहे. या कामी प्रकल्पाचे प्रमुख विमल केडीया,संयोजक अरविंद मारडीकर,गौरव श्रीवास्तव,संतोष गायकवाड हे अथक परिश्रम घेत आहेत.