◾ घातक रसायनाची विल्हेवाट लावली जात असताना देखील जिल्हा प्रशासशाचे दुर्लक्ष यामुळे ग्रामीण भागातील शेतजमीन झाली नापीक
देशातील सर्वात प्रदुषणकारी तारापुर औद्योगिक क्षेत्रातुन निघणाऱ्या घातक रसायनाने पर्यावरणाची हाणी झाली तरी चालेल पण उद्योजक जगला पाहिजे अशी आताच्या राज्य सरकारची भुमिका आहे असे बोलल्यावर पटकन आक्षेप घेतला जाईल. परंतु सद्यस्थितीत हीच परिस्थिती तारापुर मध्ये असुन येथील प्रदुषण करणाऱ्या कारखान्यांना वरिष्ठ पातळीवरून मोकळीक दिली जात आहे. यातच आता अशा प्रदुषणकारी कारखान्यांचा घातक रासायनिक घनकचरा व घातक रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी केमिकल माफियांनी जोमाने सुरुवात केली असुन ग्रामीण भागातील शेत जमीनीवर रात्रीच्या वेळी हे रसायन सोडुन दिले जात असल्याचे प्रकार सातत्याने घडत चालले आहेत. तक्रार करून देखील जिल्हा प्रशासना बरोबर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन चोरट्या पध्दतीने रासायनिक घनकचऱ्यांची व रसायनाची वाहतूक केली जात असल्याचे गेल्या महिन्याभरात अनेकदा पालघर दर्पणने उघडकीस आणले होते. तारापुरच्या केमिकल माफियांना राजकीय पाठिंबा असल्याने चौक्यावरून बेकायदेशीर केमिकल वाहतूक होत असताना तक्रार दिल्यानंतर देखील बोईसर पोलीस देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. याचे कारण देखील तसेच असुन केमिकल मधुन निघणारा सोनेरी वायु मुळे अनेकांचे अच्छे दिन आले आहेत. तारापुर औद्योगिक क्षेत्राचा भाग 100 टक्के प्रदुषित केल्यानंतर आता केमिकल माफियांनी ग्रामीण भागाकडे आपले लक्ष वळवले आहे. आता ग्रामीण भागातील निर्जन स्थळी रसायनाची रात्रीच्या वेळी विल्हेवाट लावली जात असुन असाच प्रकार वाडा-मनोर रोड वरील सापणे फाटा येथे उघडकीस आला आहे. याठिकाणी 27 जुन शनिवारी रात्रीच्या वेळी घातक रसायन सोडून दिल्याने मोठ्या प्रमाणात लहान झाडांचे नुकसान झाले होते. याबाबत अनेक वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर देखील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलेले नाही.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पासुन साधारण पणे 15 किलोमीटर लांब असलेल्या वरले व सापणे गावाच्या मध्ये हे रसायन रस्त्याच्या बाजूला निर्जन स्थळी टाकण्यात आले होते. वाडा- मनोर रस्त्यावर हा भाग असुन येथील जंगल भागाचा फायदा घेवुन केमिकल माफियांनी रात्रीच्या वेळी हे रसायन टाकल्याची शक्यता आहे. सापणे येथील घटना ताजी असतानाच वाडा-मनोर रोडवरील ग्रुप ग्रामपंचायत आंभाई-आमगाव हद्दीतील कोहज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आंभाई घाटात भास्कर देऊ भोईर या शेतकऱ्याच्या शेतात देखील 2 जुलैच्या रात्री अज्ञात टँकर मधून हे केमिकल सोडले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घातक उग्रवास येणाऱ्या रसायने येथील नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास जाणवत असुन रसायन पायाला लागल्याने येथील एका मुलीला पायाला जखम देखील झाल्याचा प्रकार घडला आहे. यातच मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे हे घातक विषारी रसायन नदी नाल्यात जाण्याची शक्यता असल्याने येथील नागरीकांंचे आरोग्य धोक्यात आले असताना देखील जिल्हा प्रशासन अशा केमिकल माफियांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही.
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन निघाणारे घातक टाकावु रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी हे रसायन मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे पाठवणेबंधनकारक असताना या रसायनाची रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात विल्हेवाट लावण्यात येत आहे. पावसाळ्यात रासायनिक घनकचरा व रसायनाची विल्हेवाट लावण्याचे प्रमाण वाढलेले असते रात्रीच्या वेळी रसायनाची विल्हेवाट लावल्यानंतर जोरदार पाऊस पडल्यावर रसायनाची विल्हेवाट लावली हे दिसून येत नाही. परंतु हेच विषारी रसायन नदी नाल्यात वाहून जात असल्याने त्याचा धोका अधिकच वाढला आहे.
मागच्या काही महिन्यापूर्वी पालघर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साखरे डँम भागात औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यांचे रसायन सोडण्यात आले होते. परिणामी या कारखान्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही. फक्त वाहन चालकावर गुन्हा दाखल करून हे प्रकरण सोईस्कर पणे मिटविण्यात आले होते. या महत्त्वाच्या विषयावर जिल्हा प्रशासनाने देखील दुर्लक्ष केल्याचे दिसून आले होते. यामुळे येणाऱ्या काळात शासनाने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केल्यास जिवीत हाणी व पर्यावरणाची मोठी किंमत मोजावी लागणार हे नक्कीच आहे.
— हेमेंद्र पाटील