◾ महत्वाची कागदपत्रे आणि कपाटांवर प्लास्टिक टाकण्याची वेळ
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: वाडा तालुक्यातील जमिनीच्या प्रत्येक भागाचे नकाशे व अन्य अतिशय महत्त्वाची माहिती भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध असते. मात्र हा वाडा तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयाची इमारत देखभाल दुरुस्ती अभावी अतिशय धोकादायक अवस्थेत आहे.
वाडा तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने आधीच दुरुस्तीच्या नावाने बोंब असलेल्या या इमारतीची अवस्था दयनीय झाली असून लिपिक बसत असलेल्या खोलीमध्ये तर पाण्याची संततधार लागली आहे. विजेच्या उपकरणांना शॉक लागत असल्याने कार्यालयातील विजही बंद करून ठेवली असून पाण्यापासून बचाव करण्यासाठी येथील टेबल व अन्य साधने अतिशय बकालपणे प्लास्टिक ने झाकून ठेवण्याची नामुष्की कार्यालयावर आली आहे. या इमारतीचे छत अनेक वर्षांपासून पावसाळ्यात गळत असते शिवाय इमारतीच्या खिडक्या प्लायवूड ने झाकून ठेवल्या आहेत. खरंतर या इमारतीची कायमस्वरूपी दुरुस्ती करणे गरजेचे असून याबाबत अनेकदा मागणी केल्याचे भूमी अभिलेख अधिकारी सांगतात.
सरकारी इमारतींची दुरुस्ती व नव्याने उभारणी सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असते मात्र प्रस्ताव देऊनही इतक्या महत्वाच्या इमारतीकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात असून याबाबत वाडा उप विभागाचे अभियंता दिलीप बाविस्कर यांना विचारले असता ठेकेदारास इमारतीवर प्लास्टिक टाकून दुरुस्तीबाबत सांगितले असून कायमस्वरूपी दुरुस्तीबाबत काही कागदोपत्री माहिती उपलब्ध आहे का याबाबत मला कल्पना नसून अधिक माहिती घेऊन आपल्याला कळवितो असे त्यांनी सांगितले.
◾ दुरुस्तीबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले असून प्रत्यक्ष भेटी नंतर दुरुस्तीचे आश्वासन देण्यात आले आहे. कागदपत्रे सुरक्षित असून लवकरच दुरुस्ती होईल अशी आशा आहे.
—राजू यशोद,
उप अधीक्षक, भूमी अभिलेख वाडा