◾ रेती वाहतुकीच्या परवान्यावर केली जात होती किनारपट्टी भागातील वाळूची तस्करी; पावसाळ्यात नौका बंद असताना देखील खाडीपात्रात दिली होती उत्खनन करण्याची परवानगी
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
बोईसर: पावसाळ्यात नौका मार्ग बंद असताना देखील मुरबे येथील रेती गाळ काढण्यासाठी दिलेला नियमबाह्य परवाना अखेर महसूल विभागाने रद्द केला आहे. रेतीच्या परवान्यावर समुद्र किणाऱ्यावर असलेल्या वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे उघड झाले होते. याबाबत आठवडाभरापुर्वी पालघर दर्पणने वृत्त प्रसिद्ध करून त्यांचा पाठपुरावा केला होता. त्यांची दखल घेत महसूल विभागाने मुरबे रेती बंदरातील रेती उत्खननाची चौकशी करून उत्खननाचा परवाना रद्द केला आहे. याबाबत आदेश सोमवारी उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयातून निर्गमित करण्यात आल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.
पालघर किणारपट्टी भागातून रात्रीच्या वेळी वाळुची तस्करी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. रेतीचा परवाना दाखवुन किनाऱ्यावर वाळूची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार आठवडा भरापूर्वी समोर आला होता. बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलेला बेकायदेशीर वाळूची तस्करी करणारा ट्रक दुसऱ्या दिवशी वाहतुक परवाना असल्याचे सांगत सोडुन दिला होता. मात्र याबाबत सडेतोड वृत्त पालघर दर्पणने प्रसिद्ध करून वाळूची होणारी तस्करी उजेडात आणली होती. मुरबे खाडी पत्रातून गाळ काढण्यासाठी खनिकर्म विभागाकडून हातपाटीद्वारे रेती उत्खनन व वाहतूक परवाना अनिल पाटील यांना देण्यात आला होता. दुध नदी खाडी पात्र ते सातपाटी बंदर रेती गटातील नौका वाहतूक मार्ग सुकर करण्यासाठी 1 जुलै ते 31 जुलै 2020 या कालावधी साठी 50 ब्रास रेती वाहतुकीला परवाना देण्यात आला होता. पावसाळ्यात बोटी बंद असताना खाडीपात्रात गाळ काढण्यासाठी परवानगी कशासाठी देण्यात आली हा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
जिल्हा खनिकर्म विभागाने दिलेला रेती वाहतूक परवान्या बाबत पालघरच्या तहसीलदार यांना माहिती देण्यात आली नाही. परस्पर दिल्या गेलेला परवाना हा वाळू तस्करी करणाऱ्या माफियांना चोरटी वाळू सुरक्षित पणे वाहतूक करता यावी यासाठीच दिला गेल्याचा आरोप नागरीकांन कडुन केला जात होता. त्यामुळे किनारा भागातील वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने किनारपट्टी भागाचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान जिल्हा खनिकर्म विभागाने मुरबे बंदरात जाऊन सुरूवातीला तपासणी देखील केली होती. मात्र या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. मात्र वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल घेत पालघर उप जिल्हा अधिकारी डॉ. किरण महाजन यांनी तातडीने मुरबे बंदरात रेती वाहतुकीसाठी देण्यात आलेला परवाना रद्द करण्यात आला असुन या आदेशाने रेती माफियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.