◾ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचना धुडकावून घनकचऱ्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न; हजारो टन रासायनिक घनकचरा आला कुठून याबाबत कारवाई नाही
◾ दिवसेंदिवस तारापूरचे प्रदूषण वाढत चालले असून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कारखान्यांवरील नियंत्रण सुटले
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात बेकायदेशीर पणे साठवणूक करून ठेवलेल्या अतिशय धोकादायक अशा रासायनिक घनकचऱ्यांची नियमबाह्य पणे वाहतूक केली जात आहे. कारखान्यात साठवणूक करून ठेवलेल्या रासायनिक घनकचऱ्या बाबत या उद्योजकांचे चार कारखाने बंद करून हा घनकचऱ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी अटीशर्तीवर परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अटींची पुर्तता न करताच कारखानदारांने नियमबाह्य पणे घनकचऱ्यांची वाहतूक केली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थ केअरने हस्तांतरित केलेल्या न्यूट्रा प्लस इंडिया लि. प्लाँट नं. टी- 30, एल- 11, एल- 9/3 व एन-92 या कारखान्यात बेकायदेशीर पणे हजारो टन घातक घनकचऱ्यांची साठवणूक करण्यात आली होती. कारखान्यांना परवानगी नसलेले बेकायदेशीर उत्पादन घेवून त्यातून निघालेला हा रासायनिक घनकचरा व रसायन होते. यातच याअगोदर देखील अतिशय घातक असलेले रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक करताना मनोर पोलिसांनी वाहनावर कारवाई देखील केली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 14 जुलै रोजी जारी केलेल्या आदेशामुळे न्यूट्रा प्लस या कंपनीने त्यांच्या कंपनीच्या आवारामध्ये साठवणूक केलेल्या घातक घनकचऱ्याची जबाबदारी घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे हा घनकचरा पाठविण्याबाबत आदेश दिले होते. मात्र वारंवार प्रदूषणात अग्रेसर असलेल्या कारखानदारांने हा घनकचऱ्यांची वाहतूक करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियम धुडकावून घनकचऱ्यांची वाहतूक सुरू केली आहे.
रासायनिक घनकचऱ्यांची विल्हेवाट करण्याची कार्यपद्धतीबाबत तसेच कारखाना व्यवस्थापन बदलल्या बाबतची कागदपत्रे प्रदूषण नियंत्रण मंडळाला देणे बंधनकारक करण्यात आले होते. त्याच पद्धतीने या व्यवस्थापनाच्या ताब्यात असलेल्या टी-30, एल-11, एल-9/3, व एन-92 या चार प्लॉटमध्ये साठवणूक केलेल्या घातक घन कचऱ्याची चाचणी व परीक्षण करून त्याचा अहवाल देणे. घातक घनकचरा मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड याठिकाणी योग्य पद्धतीने व टप्प्याने पाठवण्याबाबत कार्यपद्धती प्रदूषण मंडळाला देवुन या सर्व ठिकाणी नाईट विजन असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा सर्व प्रवेशद्वारांवर बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते. याबाबत अधिकारी माहिती साठी उपप्रादेशिक अधिकारी मनिष होरकर यांना संपर्क साधला असता कारखानदारांने याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती व कागदपत्रे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आजूनही देण्यात आले नसल्याचे सांगितले. यामुळे सद्या सुरू असलेले रासायनिक घनकचऱ्यांची वाहतूक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले असताना देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा कडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई या प्रदूषणकारी कारखान्यावर केली जात नाही.
◾ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रदूषणकारी कारखान्यावरील नियंत्रण सुटले
गेल्या दोन महिन्यांन पासून तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थ केअर या रासायनिक कारखान्याच्या प्रदूषणाचा विषय वारंवार समोर येत आहे. नागरीकांनी तक्रारी करून देखील या कारखान्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही. रासायनिक घनकचऱ्यांची वाहतूक करतांना देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व नियम धुडकावून वाहतूक केली जात आहे. असे असले तरी कारवाई करू या पलिकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उत्तर देत नसून ते राजकीय दबावामुळे हतबल असल्याचा आरोप नागरीकांन कडून केला जात आहे.
◾ कारखान्यात साठवणूक करून ठेवलेला रासायनिक घनकचरा नेमका कुठून आला याबाबत कोणत्याही प्रकारची चौकशी देखील केली जात नाही. कारखानदारांने पर्यावरणाची हानी केली यामुळे त्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी देखील नागरीकांन कडून केली जात असून याबाबत तक्रारी देखील दाखल आहेत.
◾ रासायनिक घनकचऱ्यांची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. जे नियम घालण्यात आले आहेत त्याबाबत कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. कागदपत्रे सादर न करताच वाहतूक केली जात असेल तर त्याबाबत कारवाई साठी सुचना देवु. तसेच आलेल्या तक्रारी नुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
— राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ठाणे