◾ गुटखा माफिया व पालघर पोलिसांच्या संपर्कावर शिक्कामोर्तब; गुटखा माफियांंच्या संपर्क असणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह एका पोलिसांचे निलंबन
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: गुजरात राज्यातुन महाराष्ट्रात बेकायदेशीर पणे गुटखा पुरवठा करणाऱ्या माफियांन सोबत पोलिसांचे संबंध उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुटखा माफियांशी संपर्कात राहिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि मनोर पोलिस ठाण्यातील एका हवालदाराला पोलीस महानिरीक्षक यांनी निलंबित केले आहे. महिन्याकाठी लाखो रूपयाची रक्कम घेतली असल्याबाबत मिरारोड येथील गुटखा माफियांने पोलिसांन विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारी वरून दोन पोलिसांन वर कारवाई केली असल्याने गुटखा माफिया व पोलिसांच्या संपर्कावर शिक्कामोर्तब झाला आहे.
महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना देखील गुटख्याची खुलेआम विक्री केली जात असल्याचे अनेकदा उघड झाले होते. बंदी असताना गुटखा तस्करी फक्त पोलिसांच्या संगणमताने होत असल्याबाबत आरोप केले जात होते. मात्र आता गुटखा माफियांनेच पोलिसांन विरोधात तक्रार दाखल केल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मिरा रोडच्या एका गुटखा माफियाने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन महिन्याकाठी लाखो रुपयांची रोख रक्कम घेतल्याचा आरोप पोलिसांवर केला केला होता. याप्रकरणी गुटखा माफियाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पालघरच्या पोलीस अधीक्षकांना तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. गुटखा माफियांच्या तक्रारीनुसार त्याने आरोप केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून कोकण विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. मनोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सरदार महाजन आणि बोईसर स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे .
◾ गुजरात राज्यातुन महाराष्ट्र राज्यात गुटख्याची तस्करी करणाऱ्या माफियांची मोठी टोळी सक्रिय आहे. मात्र यामध्ये पोलिसांचे नाव देखील पुढे आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गुटख्याची सुरक्षित पणे वाहतूक करण्यासाठी लाखो रूपये पोलिसांनी घेतले असल्याबाबत आरोप करण्यात आला आहे. दोन पोलिसांना निलंबित केले असले तरी याच्यावर फौजदारी कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◾ गुटखा माफिया आणि पालघर पोलीस यांचे संबंध याअगोदर देखील उघड झाले होते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात गुटखा माफियांसोबतच्या संबंधामुळे कासा, विरार आणि वालीव पोलीस स्टेशन मधील पाच कर्मचाऱ्यांचे निलंबनाचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढले होते. यामुळे महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीर पणे शिरकाव करणाऱ्या गुटखा माफियांचे मुख्य सुत्रधार हे पालघर पोलीस आहेत की, काय असा सवाल उपस्थित होत आहे.