◾ सांडपाणी प्रक्रिया केंद्र व आरती ड्रग्ज कारखान्या कडून कोट्यवधी रूपयाचा दंड होणार वसूल; तारापूर प्रदूषणात आरती ड्रग्ज या प्रदूषणकारी कारखान्याचा मोठा वाटा
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: देशातील सर्वात प्रदूषणकारी व प्रदूषणाबाबत पहिल्या क्रमांकावर असलेल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना राष्ट्रीय हरित लवादाने चांगलीच चपराक दिली आहे. तारापूर येथील कारखान्यांनी केलेल्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचे झालेले नुकसान याची भरपाई म्हणून कोट्यवधी रूपयाचा दंड कारखान्यांन कडून वसूल केला जाणार आहे. अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणा विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. याविषयी दिल्ली येथे झालेल्या सुनावणीत प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई बाबत शिक्कामोर्तब झाला आहे.
तारापूर मधील प्रदूषणा बाबत अखिल भारतीय मांगेला समाज परिषदे कडून राष्ट्रीय हरित लवादा कडे याचिका दाखल करण्यात आली होती. रासायनिक सांडपाण्यावर सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया न करताच घातक रासायनिक सांडपाणी समुद्रात सोडले जात होते. याबाबत अनेक तक्रारी स्थानिक पातळीवर देखील करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय हरित लवादाने 26 सप्टेंबर 2019 रोजी सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणाऱ्या तारापूर एन्वायरोन्मेन्ट प्रोटेक्शन सोसायटीला 10 कोटी रूपयाचा दंड ठोठावुन तो वसूल करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. याच आदेशामध्ये टीईपीएस व प्रदूषणकारी कंपन्यांनी पर्यावरणाला पोचवलेल्या हानीचा अभ्यास करुन नुकसान भरपाईसाठी जबाबदारी निश्चित करुन अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये केंद्रीय पर्यावरण नियंत्रण मंडळाचा (सीपीसीबी) प्रतिनिधी, इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (आयआयएम) अहमदाबादचा प्रतिनिधी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) अहमदाबादचा एक प्रतिनिधी, नॅशनल एन्वायरोन्मेन्टल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी) चा शास्त्रज्ञ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला होता.
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या समितीने तारापूर औद्योगिक वसाहतीच्या प्रदूषणामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेणे, पर्यावरणाचा समतोल स्थापित करावयाच्या उपाययोजनेसाठी आर्थिक खर्चाचे अंदाजपत्रक सादर करणे, सामूहिक सांडपाणी प्रक्रीया केंद्र (सीईटीपी) आणि प्रदूषणास जबाबदार असलेल्या कंपन्यांची सुनावणी घेऊन त्यांच्यावर नुकसानीची जबाबदारी निश्चित करणे. अशा बाबीसंदर्भात समितीने सखोल चौकशी करून 2 जानेवारी 2020 रोजी आपला सविस्तर अहवाल सादर केला होता. तारापूर औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याचे 9 नाले, नवापुर – दांडी खाडी, खारेकुरण- मुरबे खाडीचे उत्तर आणि दक्षिण टोक येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. तसेच नवापुर, नांदगाव आणि एडवण येथील समुद्राचे पाणी व वाळूचे नमुने तपासले. शिवाय परिसरातील 6 कूपनलिकांच्या पाण्याचे नमुने तपासले. या तपासणीमध्ये नाल्यांतील सांडपाण्यात घातक विषारी घटकांचे प्रमाण मर्यादेपेक्षा खूपच अधिक प्रमाणात आढळून व दुर्गंधी युक्त असल्याचे दिसून आले होते.
नवापूर- दांडी खाडीतील नमुन्यात प्राणवायूचे प्रमाण अतिशय कमी झाल्याचे तपासणी मध्ये आढळून आले असून मुरबे- खारेकुरण खाडीतील काळपट रंगा बाबत अधिक तपासणी होणे गरजेचे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातच कुपनलिका मध्ये भूगर्भातील पाण्यास रसायनांचा दुर्गंध येत असून पास्थळ येथील पाणी तांबूस रंगाचे आढळले होते. सामूहिक प्रक्रिया केंद्र फारच निकृष्ट दर्जाचे असल्याचे मत समितीने व्यक्त करत साठवणूक टाकीमध्ये अंदाजे 2400 मेट्रीक टन घनकचरा पडून असून त्यातून होणारी गळती ही नाल्यात जाते व तेच नाले नवापूर खाडीत जातात. अशा प्रकारे प्रदूषित सांडपाणी नवापूर – दांडी खाडीत जात असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणास जबाबदार ठरवलेल्या 221 कंपन्यांना सुनावणी देण्यात आली. मात्र सुनावणीस 216 कंपन्यांनी प्रतिसाद दिला. उर्वरीत 5 कंपन्या सुनावणीस हजर राहिल्या नसल्ल्याने समितीने त्यातील 102 कंपन्या आणि सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांना प्रदूषणास जबाबदार ठरविले आहे. यामुळे सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणाऱ्या तारापूर एन्वायरोन्मेन्ट प्रोटेक्शन सोसायटी चांगलाच झटका बसला आहे.
प्रदूषित सांडपाणी नैसर्गिक नाले, खाड्या आणि समुद्रात जात असल्यामुळे मत्स्यसंपदेची हानी झाली असून मच्छिमारांच्या राहणीमानावर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच परिसरातील लोकांच्या आरोग्यावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दुष्परिणाम झाला असल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदविण्यात आला असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढले असल्याचे नमुद करण्यात आले आहे. नुकसानीचा अभ्यास करताना याचिका दाखल करण्यापूर्वीची 5 वर्षे गृहीत धरण्यात आली असून प्रदूषणामुळे समुद्राच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज एकूण 5 कोटी 93 लाख 81 हजार रुपये, खाडी व खाजणाच्या नुकसानीचा 79 कोटी 10 लाख 42 हजार रुपये असे एकूण 85 कोटी 4 लाख रुपये अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भूगर्भातील पाण्याचे नुकसान ठरविण्यास समितीने असमर्थता व्यक्त केली असून त्याशिवाय पर्यावरण सुस्थापित करण्यासाठी 75 कोटी रुपयांचा निधी असावा असे समितीने सुचविले आहे. उपाययोजनांसाठी समितीने एकूण 160 कोटी 4 लाख रुपयांचा निधी उभारण्यासाठी सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि 102 प्रदूषणकारी कारखाने यांच्यावर नुकसानीची जबाबदारी निश्चित केली आहे. कारखान्यांना दंड प्रस्तावित केला असल्याने तारापूर मधील प्रदूषणकारी कारखान्यांन बरोबर सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली असून या प्रकरणी आता हरित लवादासमोर 17 सप्टेंबर 2020 रोजी सुनावणी होणार आहे.
◾ कोणाकडून होणार किती दंड वसुली
1) सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांकडून 72 कोटी 31 लाख 47 हजार रुपये वसूल करण्यात येणार आहे.
2) तारापूर मधील 102 कंपन्या कडून उर्वरित रक्कम वसूल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून प्रत्येक कंपनीने केलेल्या नियमभंगाचे स्वरूप, व्याप्ती आणि नियमभंगाची वारंवारिता विचारात घेऊन प्रत्येक कंपनीला स्वतंत्रपणे दंड आकारला आहे.
3) आरती ड्रग्ज या अतिशय प्रदूषणकारी कारखान्याच्या खालील प्रमाणे दंड लावण्यात आला आहे.
◾ N 198/199 युनिटला सर्वाधिक 10 कोटी 42 लाख रुपये
◾ E21/22 येथील युनिटला 1 कोटी 54 लाख रुपये
◾ L5/8/9 येथील युनिटला 1 कोटी 14 लाख रुपये
◾ G 60 युनिट, E 50 युनिट व K 17/18/19 युनिटला प्रत्येकी 45 लाख रुपये दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.