◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणकारी बजाज हेल्थ केअर कारखान्यांकडून वारंवार होत आहे घातक रसायनाची बेकायदेशीर वाहतूक; घातक रसायन भरून ड्रम विल्हेवाट लावण्यासाठी घेवुन जात असताना बोईसर पोलीस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका बंद करण्यात आलेल्या रासायनिक कारखान्यातुन बेकायदेशीर पणे घातक रसायनाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरापासून या कारखानदारांच्या विविध कारखान्यातुन प्रदूषणाचे विषय उघड झाले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारखान्यातील घातक घनकचऱ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे पाठविण्याबाबत आदेश दिले होते मात्र या कारखानदारांने बेकायदेशीर पणे घातक रसायन विल्हेवाट लावण्यासाठी घेवुन जात असताना वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नं. एल 9/3 या पूर्वीच्या न्युट्राप्लस इंडिया लि. व आता बजाज हेल्थ केअर या कारखान्यांने हस्तांतरित केलेल्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक घनकचऱ्यांची व रसायनाची साठवणूक करण्यात आली होती. यामुळे या कारखान्याला उत्पादन बंद करण्याचे आदेश देत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा कारखाना बंद केला होता. कारखान्यात उपलब्ध असलेला घातक रासायनिक घनकचऱ्यांची तपासणी करून त्यावर फौजदारी कारवाई करणे गरजेचे असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारखान्याला मोकळीक देवुन रासायनिक घनकचरा मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे पाठविण्याचे आदेश दिले. मात्र या उद्योजकांने कारखान्यातील घातक रसायन बोईसर येथील केमिकल माफियांच्या मदतीने विल्हेवाट लावण्यासाठी 13 आँगस्ट रोजी दुपारी घेवुन जात असताना बोईसर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेतले होते.
बोईसर भागातील एका केमिकल माफियांने वाहन क्र. एमएच 48 वाय 1697 हे वाहन औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नं. एल 9/3 या बजाज हेल्थ केअर कारखान्याने हस्तांतरित केलेल्या कारखान्यात बेकायदेशीर पणे रसायनाचे ड्रम भरत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रारी नुसार मिळाली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तारापूर येथील उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी त्यांना प्राप्त झालेल्या तक्रारी नुसार बोईसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांना घातक रसायनाची वाहतूक होत असल्याबाबत माहिती दिली होती. यानुसार बोईसर पोलिसांनी अवधनगर भंगार गल्ली याभागातुन वाहन ताब्यात घेतले असून या वाहनात घातक रसायन भरलेले ड्रम आहेत. वाहन चालकांने रसायन ज्या कारखान्यातुन भरलेले त्याठिकाणी ताब्यात घेतलेल्या आरोपीसह बोईसर पोलीस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी तपासणी केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
◾ प्रदूषणकारी कारखान्यांं बाबत वारंवार तक्रारी नागरीकांन कडून केल्या जात असताना देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांच्या कडून बजाज हेल्थ केअर या प्रदूषणकारी कारखान्याला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला जात आहे. कारखान्यां कडून वारंवार प्रदूषण होत असताना देखील अशा उद्योजकांवर फौजदारी कारवाई का केली जात नाही असा सवाल नागरीकांन कडून उपस्थित केला जात आहे. याबाबत अधिक माहिती साठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांना वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.