◾ बजाज हेल्थ केअरने हस्तांतरित केलेल्या कारखान्यातून घातक रसायनाची विल्हेवाट लावण्याचे प्रकार उघड; घातक रसायनाची वाहतूक करणारे वाहन पोलिसांच्या ताब्यात
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका बंद करण्यात आलेल्या रासायनिक कारखान्यातुन बेकायदेशीर पणे घातक रसायनाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरापासून या कारखानदारांच्या विविध कारखान्यातुन प्रदूषणाचे विषय उघड झाले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कारखान्यातील घातक घनकचऱ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे पाठविण्याबाबत आदेश दिले होते मात्र या कारखानदारांने बेकायदेशीर पणे घातक रसायन विल्हेवाट लावण्यासाठी घेवुन जात असताना वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नं. एल 9/3 या पूर्वीच्या न्युट्राप्लस इंडिया लि. व आता बजाज हेल्थ केअर या कारखान्यांने हस्तांतरित केलेल्या रासायनिक कारखान्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक घनकचऱ्यांची व रसायनाची साठवणूक करण्यात आली होती. यामुळे या कारखान्याला उत्पादन बंद करण्याचे आदेश देत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा कारखाना बंद केला होता. कारखान्यात उपलब्ध असलेला घातक रासायनिक घनकचऱ्यांची तपासणी करून त्यावर फौजदारी कारवाई करणे गरजेचे असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात होता. या उद्योजकांने कारखान्यातील घातक रसायन बोईसर येथील केमिकल माफियांच्या मदतीने विल्हेवाट लावण्यासाठी 13 आँगस्ट रोजी दुपारी घेवुन जात असताना बोईसर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेतले.
बोईसर भागातील एका केमिकल माफियांने वाहन क्र. एमएच 48 एवाय 1697 हे वाहन औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नं. एल 9/3 या बजाज हेल्थ केअर कारखान्याने हस्तांतरित केलेल्या कारखान्यात बेकायदेशीर पणे रसायनाचे ड्रम भरले जात असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रारी नुसार मिळाली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तारापूर येथील उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी त्यांना प्राप्त झालेल्या तक्रारी नुसार बोईसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांना घातक रसायनाची वाहतूक होत असल्याबाबत माहिती दिली होती. यानुसार बोईसर पोलिसांनी अवधनगर भंगार गल्ली याभागातुन वाहन ताब्यात घेतले असून या वाहनात घातक रसायन भरलेले ड्रम आहेत. वाहन चालकांने रसायन ज्या कारखान्यातुन भरलेले त्याठिकाणी ताब्यात घेतलेल्या आरोपीसह बोईसर पोलीस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी तपासणी करून बोईसर पोलीस ठाण्यात पर्यावरण अधिनियम कलम, घातक रसायने अधिनियम, घातक घनकचरा व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन यानुसार केमिकल वाहतूक करणाऱ्या रशीद चौधरी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
◾ बोईसर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत कारखान्यांचे व्यवस्थापक आर. सी. पाटील यांच्या सांगण्यावरून केमिकलची बेकायदेशीर वाहतूक केल्याचा उल्लेख आहे. याबाबत संबंधित केमिकल माफियांने पोलिसांन सोबत जाऊन घातक रसायन एल- 9/3 या कारखान्यातुन भरल्याचे घटनास्थळी जाऊन दाखवले तरी देखील प्रथमदर्शनी कारखान्यांच्या व्यवस्थापकावर व कारखाना मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यातच हा घनकचऱ्यांची व घातक रसायनाची बेकायदेशीर पणे विल्हेवाट लावण्यासाठी रशीद चौधरी या भंगार माफियाला बोईसर मधील एका राजकीय नेत्यांच्या भावाने काम सोपवले होते. राजकीय दबावाखाली येवून पोलिसांनी नेत्यांच्या भावाला मोकळीक दिल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत अधिकारी माहिती साठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांना विचारले असता गुन्हा दाखल करून तपास सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले.
◾ केमिकल माफियांना राजकीय वरदहस्त
अवधनगर येथील केमिकल माफियांना राजकीय वरदहस्त असल्याने केमिकल माफियांचे फावत चालले आहे. बजाज हेल्थ केअरने हस्तांतरित केलेल्या टी-30 कारखान्यातील घातक रसायन भरलेले ड्रम घेवून जाताना मनोर पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले होते. यावेळी देखील रशीद चौधरी इसमाने हा ठेका बोईसर मधील राजकीय पुढाऱ्यांच्या भावाकडून घेतला होता. नेत्यांचा भाऊ केमिकल माफिया बनला असल्याने बोईसर पोलीस देखील नेत्यांच्या दबावाखाली असल्याचे दिसून येते. यामुळे अशा केमिकल माफियांवर कारवाई बाबत चक्र कधी फिरतील याकडे पाहणेच औचित्याचे ठरेल.