पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणे शंभर टक्के भरली आहेत.तारापूर औद्योगिक वसाहत, पालघर नगरपरिषद आणि वसई विरार महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सुर्या प्रकल्पाअंतर्गतची तीनही धरणे आणि इतर लहान मोठी धरणेही तुडुंब भरल्याने जिल्ह्यातील पिण्याचे पाणी आणि सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.
पालघर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीनजीक वाहत आहेत. पाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी सुर्या प्रकल्पा अंतर्गत धामणी, कवडास आणि वांद्री ही तीनही धरणे तुडुंब भरल्याने 311 द.ल.घ.मी.पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.जिल्ह्यातील लघुपाट योजनेतील 11 लहान धरणेही तुडुंब भरली असून या धरणांमध्ये 24.794 द.ल.घ.मी.पाणीसाठा निर्माण झाला आहे.
पालघर तालुक्यातील माहीम-केळवा लघुपाट 3.242 द.ल.घ.मी,मनोर लघुपाट 2.485 द.ल.घ.मी.आणि देवखोप लघुपाट 3.285 द.ल.घ.मी. तर डहाणू तालुक्यातील रायतळे लघुपाट 1.875 द.ल.घ.मी, विक्रमगड तालुक्यातील खांड 4.500 द.ल.घ.मी. आणि मोहखुर्द लघुपाट 4.756 द.ल.घ.मी.जव्हार तालुक्यातील डोमिहिरा लघुपाट 14.490 द.ल.घ.मी. आणि मोखाडा तालुक्यातील वाघ लघुपाटात 10.302 द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या तलासरी तालुक्यातील कुर्झे धरण 92 टक्के भरले आहे.आजमितीला कुर्झे धरणात 38.21 द.ल.घ.मी.इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने सुर्या, वैतरणा आणि पिंजाळ या नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह इशारा पातळीनजीक वाहत आहेत.
◾ पालघर नगरपरिषद आणि वसई विरार महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे धामणी आणि कवडास ही धरणे पूर्ण भरली आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे पाटबंधारे विभागाअंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील लहानमोठ्या बारा धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील शेतीला सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.