◾ डहाणू तालुक्यातील उर्से गावात एक गाव एक गणपती परंपरा अविरतपणे सुरू
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: कोरोनाच्या सावटात पालघर जिल्ह्यात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गावांमध्ये एकापेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु एक गाव एक गणपती सारखी संकल्पना फार कमी ठिकाणी दिसून येते. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील एका गावानं गेल्या ४८ वर्षांपासून एक गाव एक गणपतीची संकल्पना अविरतपणे सुरू ठेवली आहे.
पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील सूर्या नदीच्या तिरावर वसलेलं आणि निसर्गरम्य उर्सें गावाची लोकसंख्या अडीच हजारांच्या घरात असून याच गावानं एक गांव एक गणपतीच्या माध्यमातून आदर्श उभा केला असून यंदाचं गणेशोत्सवाचं हे ४८ वं वर्ष आहे. गणेशोत्सवचं नाही तर या गावात सर्वच सण एकत्र येऊन साजरे केले जातात. याठिकाणी गावात घरघुती गणपती बसवले जात नाहीत. त्यामुळे संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येऊन गणेशोत्सव मोठ्या आनंदानं साजरा करतात. गणेशोत्सवा दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं, खेळांचं आयोजन केलं जाते. विशेष म्हणजे गावातल्या तरुणांकडून बाप्पाच्या मखराची सजावट आणि आरास तयार केली जाते. सजावट आणि आरास इको फ्रेंडली असल्याची दक्षता घेतली जाते. यंदा बांबू,नारळाच्या पात्या, लाकडाचा भुसा,कापूस आदी साहित्यांपासून नारळ तयार करून त्यात बाप्पांना विराजमान करण्यात आले आहे.
दरवर्षी लॉटरी पद्धतीने मुर्ती आणणाऱ्या ग्रामस्थाचे नाव निश्चित केले असून बाप्पाची मूर्ती आणणाऱ्याला पूजेला बसण्याचा मान मिळतो. विसर्जनानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो. भक्तीभावाने ग्रामस्थ सर्व वस्तू चढ्या भावानं खरेदी करतात. गणेशोत्सव साजरा केल्यानंतर उर्वरित पैसे गरजूंना वाटप केले जातात. आणि याच पैशातून पुढीच्या वर्षीचा गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा गणेशोत्सवाच्या माध्यमातून उर्से गावानं जनतेला एकतेचा सामाजिक संदेश देण्याचा एक प्रयत्न केला आहे.