पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी निर्बंध आले असले तरी योग्य खबरदारी घेवून बोईसर मध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला. बोईसर येथील विदर्भ मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरीकांनी रक्तदान करून एक सामाजिक संदेश देण्यात आला.
पारंपरिक पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून बोईसर येथे असलेल्या विदर्भ मित्र मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे. आपली संस्कृती जपत हे मंडळ उत्सव साजरा करत असून यावेळी असलेल्या करोनाच्या संकटावर मात करून साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. मंडळाकडून आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 105 रक्त दात्यांनी रक्तदान केले असून मंडळाच्या सदस्यांनी देखील रक्तदान करत शिबीर उस्फूर्त पणे पार पाडले आहे. हे शिबीर कुटीर रुग्णालय जव्हार या रक्तपेढी मार्फत घेण्यात आले होते. यावेळी विदर्भ मित्र मंडळाचे अध्यक्ष कृष्णा देशमुख, उपाध्यक्ष गजानन देशमुख, मुकेश लांजेवार, जगदीश भूते, मा. पंचायत समिती सदस्य विणा देशमुख, ममता देशमुख, पीडी सुझुकीचे संचालक देवेश देशमुख, मनिष काळे, राहुल पांडे, शैलेश मोरखेडे, शरद लांजेवार, अतुल तायडे व बबनराव देशमुख आदी उपस्थित होते.