पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यात करोना मुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून ही गोष्ट चिंताजनक असल्याचे सांगून जर मृत्यूदर कमी करायचा असेल तर संशयित रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करून रुग्णालयात दाखल व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे. आतापर्यंत मृत्यू पावलेल्या व्यक्तींपैकी 60% व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 72 तासांमध्ये मृत झालेल्या आहेत. यावरून संशयित रुग्ण चाचणी करून घेण्यास पुढे येत नाही तदनंतर गंभीर परिस्थिती आल्यावर रुग्णालयात दाखल होत असल्याने उपचार करण्यास पुरेसा कालावधी मिळत नसल्याने परिणामी रुग्णाचा मृत्यू ओढवत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
पालघर जिल्ह्यातील ज्या गावात अथवा प्रभागात पाचपेक्षा जास्त रुग्ण कार्यरत (ऍक्टिव्ह) असतील तेथे तपासणी शिबिर लावण्यात येणार आहे. तसेच दररोज पाचशे RTPCR आणि दोनशेहून अधिक अँटीजन टेस्ट आता करता येऊ शकतील ज्या रुग्णाला लक्षणं नाहीत परंतु जो कोरोना बाधित आहे अशा रुग्णाला संबंधित तालुक्यांमधील कोव्हीड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात येणार आहे. रिव्हेरा, टिमा, पोशेरी या कोव्हीड रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन टॅन्क बसवण्यास परवानगी मिळाली असून ऑक्सिजन ची सुविधा लवकर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील आठवड्यापासून डहाणू MRHRU लॅब मध्ये 200 मोफत चाचण्या करता येणार असून जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून सर्वांनी एकत्र येऊन कोरोना वर मात करूया असे नम्र आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.
◾ नागरीकांनी काही मदत हवी असल्यास 18001215532 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा
◾ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याअंतर्गत वॉर रूम स्थापित करण्यात आल्या असून त्यासाठी covidbed.palghar.info ही लिंक दिली आहे. याद्वारे कोव्हीड 19 चाचणी, बेड ची उपलब्धता, घरी विलगीकरण इ. बाबींची माहिती मिळू शकते.